
गोंदिया- जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यात मागील 5 दिवसांपासुन संततधार झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाले ओसंडुन वाहत आहेत. अर्जुनी/मोरगाव तालुक्यात संततधार मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे गावागावातील तलाव बोड्या,नाले तुडुंब भरले आहेत. यासोबतच तालुक्यातील गोठणगाव इटियाडोह धरण 100.00 % भरला असुन धरण आता ओव्हरफ्लो झाला आहे. तर याआधी 15 ऑगस्ट 2022 ला स्वातंत्र्यदिनी तर मागील वर्षी 21 सप्टेंबर 2023 रोजी धरण ओव्हरफ्लो झाला होता. यावर्षी 24 जुलै 2024 रोजी सलग तिसऱ्यांदा तेही मागील वर्षी पेक्षा दोन महिन्या आधीच धरण 100% भरले आहे.गोठणगाव ईटियाडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व धरण परिसरात सध्या पावसाची रिपरिप सुरु असल्याने धरणाची पाणी पातळी सतत वाढत असल्यामुळे दि. 24 जुलै रोजी धरण ओव्हरफ्लो होत धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गाढवी नदीच्या काठावरील गावांना तसेच नदीपात्रातुन आवागमन करणाऱ्या सर्व सबंधितांनी स्वत:ची काळजी घ्यावी.असा सतर्कतेचा ईशारा केशोरी पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.धरण ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांचे पाय आपसुकच गोठणगाव कडे वळत असतात.विदर्भातील जिल्ह्यासह बाहेरील मध्यप्रदेश व छत्तीसगढ़ राज्यातुन पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे येत असतात. त्यामुळे ये-जा करणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टी कोनातुन गोठणगाव इटीयाडोह धरणावरती कोनतीही अनुचित घटना घडु नये. यासाठी केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी पोलीस हवालदार, पोलीस शिपायांची नियुक्ती करत पोलीस बंदोबस्त लावला आहे.