पैगंबर हजरत मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लिम बांधव उतरले रस्त्यावर

0
80

गोंदिया:- इस्लाम धर्मातील शेवटचे पैगंबर आणि संपूर्ण जगात शांतता आणि सलोख्याचा संदेश देणारे खरे तारणहार हजरत मोहम्मद साहिब यांच्या जीवन चरित्रावर बोट दाखवून वादग्रस्त विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज शुक्रवारी नमाजानंतर हजारोंच्या संख्येने मुस्लीम समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन संताप व्यक्त केला व गोंदिया शहर पोलीस ठाण्यात त्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिस निरीक्षक किशोर पर्वाते यांना दिले.

मुस्लिम जमात गोंदियाच्या हाकेवर हजारो मुस्लिम बांधव आझाद उर्दू वाचनालयाच्या आवारात जमले. येथून हातात फलक घेऊन त्याच्या रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करत मुस्लिम बांधवांनी शहरातील खोजा मशीद, श्री टॉकीज चौक, मेन बाजार, मेनरोड लाईन, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, इसरका मार्केट, चांदणी चौक, नगर परिषद रोड, गांधी प्रतिमा, प्रभात टॉकीज, जैस्तंभ चौक, आंबेडकर चौक, नेहरू चौक, गोरेलाल चौक या मार्गावर मोर्चा काढला. येथून पोलीस ठाण्यात जाऊन निषेध व्यक्त करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले व आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. रामगिरी महाराजांचा यांच्यावर मुस्लिम समाजाचा आरोप आहे की हजरत मोहम्मद साहिब यांच्या जीवन आणि चारित्र्याचे भान न ठेवता शिवीगाळ करून त्यांच्या चारित्र्यावर बोट उचलल्याचे मुस्लिम समाजाचे म्हणणे आहे.

रामगिरी महाराजांसारखे लोक जातीय एकतेच्या या देशात विष कालवत आहेत आणि गटांमध्ये वैर आणि द्वेषाची बीजे पेरत आहेत. देशाची शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमानास्पद शब्द वापरून ते समाजात उन्माद निर्माण करत आहेत. या प्रसंगी मुस्लीम समाज म्हणाला, डॉ.बाबा साहेब आंबेडकरांच्या संविधानाचे पालन करणारे आपणच आहोत. आपण देशाच्या न्यायव्यवस्थेचे पालन करणारे लोक आहोत. रामगिरी महाराज सारखे लोक असे विषारी विष पसरवून समाज भडकवण्याचा प्रयत्न करत असून त्यांना शासनाने तात्काळ अटक करावी. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा पांचाळे गावात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान रामगिरी महाराज यांनी कथितपणे आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्याची चित्रफित समाज माध्यमावर सर्वत्र प्रसारित झाली होती. यानंतर मुस्लिम समाज संतप्त झाला आणि रामगिरी महाराजांच्या अटकेसाठी आवाज उठवला. निवेदन देणाऱ्यांमध्ये सर्व मशिदींचे इमाम व सदर, अनेक मुस्लिम संघटनांचे अधिकारी आणि मुस्लिम जमात गोंदियाच्या बॅनरखाली हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.