
* खळबंदा येथे लैंगिक व कायदेविषयक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
गोंदिया – ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींमध्ये आजही लैंगिक आरोग्य शिक्षणबाबत हवी ती मोकळीक नसल्याने त्यांच्या मनात आजही याविषयी शासंकता आहे. त्यामुळे किशोरवयीन मुलींना लैंगिक आरोग्य व कायदेविषयक शिक्षण देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजगिरी बहुउद्देशीय संस्थेच्या संचालिका व राज्य महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके यांनी मार्गदर्शन करताना केले.
तालुक्यातील ग्रामपंचायत खडबंदा येथे किशोरवयीन मुलींसाठी लैगिक शिक्षण व कायदेविषयक प्रशिक्षण कार्यक्रमा चे आयोजन 5 ऑक्टोंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
ग्रामीण भागात आजही लैंगिक शिक्षणाचा अभाव असल्याने याबाबत बोलताना किंवा वावरताना किशोरवयीन मुलींची कुचंबणा होते. त्यामुळे याबत किशोरवयीन मुलींना व पालकांना माहिती गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आज ग्रामीण भागापासून तर मोठमोठ्या महानगरापर्यंत मुलींमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन मिळणे त्यांच्या दृष्टीने गरजेचे आहे. एकंदरीत किशोरवयीन मुलींच्या मनातील न्यूनगंड दूर करण्यासाठी लैंगिक आरोग्य शिक्षण व कायदेविषयक शिक्षण अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन मार्गदर्शन करताना रजनी रामटेके यांनी केले.
यावेळी त्यांनी मुलींनी वयात येताना घ्यावयाची काळजी,सोशल मीडिया, मुलींसाठी योजना, कायदे, मासिकपाळी व्यवस्थापन, महिला व मुलांचे सहाय्य कक्ष यावरही रजनी रामटेके व जितेंद्र बोरकर यांनी मार्गदशन केले. यावेळी गावातील सर्व किशोरवाईन मुलींना सेनेटरी पॅडचे वाटप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतला दिलेल्या योगदानाबद्दल रजनी रामटेके यांना स्मृतीचिन्ह देऊन पदाधिकारी यांनी सत्कार केला. यावेळी जी. प. सदस्य अस्विनी ताई पटले, ग्रामसेवक जितेंद्र बोरकर, सरपंच द्वारकादास साठवणे, उपसरपंच कापसे, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी ताई, आशा वर्कर उपस्थित होते.