निवडणूक आचारसंहिता काळात शस्त्र बाळगण्यास मनाई

0
84

       गोंदिया, दि.17 : निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात आदर्श आचारसंहिता लागु झालेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूका निर्भय व न्यायपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये शस्त्र परवाना धारकांना शस्त्राची वाहतुक व सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. त्याअर्थी जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी भारतीय नागरीक न्याय संहिता 2023 चे कलम 163 अन्वये दिलेल्या शक्तीचा वापर करुन गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागाच्या क्षेत्रातील सर्व शस्त्र परवाना धारकांना आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत शस्त्राची वाहतुक व सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध केले आहे.

        जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवाना धारकांनी त्यांच्याकडील शस्त्र निवडणुकीच्या कालावधीकरीता पोलीस विभागाकडे जमा करावे. बँकांना शस्त्र जमा करण्यापासून सुट देण्यात येत आहे. ज्या व्यक्तींना निवडणुकीच्या काळात स्वत:कडे शस्त्र बाळगण्याची, वाहुन नेण्याची आवश्यकता असेल अशा व्यक्तींनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्फत जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांचेकडे अर्ज सादर करावे व तद्नंतर त्यांच्या अर्जावर समितीच्या सभेत विचार करण्यात येईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल.