
> प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज राहावे
> निरिक्षक दानिश अब्दुल्ला, नवनीत कुमार
बुलढाणा, दि. 25 : जिल्ह्यातील सातही मतदारसंघात निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या खर्चाच्या बाबींवर लक्ष्य ठेवण्यासाठी निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी दानिश अब्दुल्ला आणि नवनीत कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक खर्च निरिक्षक बुलढाण्यात दाखल झाले असून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च विषयक बाबींचा आढावा घेतला.
बैठकीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे, निवडणूक खर्च विषयक बाबींचे नोडल अधिकारी प्रकाश राठोड, विविध विभागाचे प्रमुख व नोडल अधिकारी, सर्व खर्च निरिक्षक उपस्थित होते.
निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या तयारीची माहिती निरिक्षकांनी घेतली. यामध्ये त्यांनी मतदारसंघ, मतदान केंद्रांची संख्या व त्याठिकाणावरील सुविधा, मतदार संख्या, भरारी पथक, स्थिर नियंत्रण पथक, कंट्रोल रुम, वेबकास्टींग सुविधा, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट, मनुष्यबळ व प्रशिक्षण, कायदा व सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कारवाई, ई-एसएमएस सेवा आदी बाबींविषय माहिती घेतली. निवडणूक काळात उमेदवार व पक्षाच्या खर्चाच्या सर्व नोंदी व्यवस्थितपणे घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. उमेदवारांच्या सभा, प्रचार वाहने, प्रचार साहित्य, भोजन, जाहिरातींवर होणाऱ्या खर्चाची नोंद ठेवावी. निवडणुकीदरम्यान तपासणी नाक्यांवर पथकांनी काटेकोरपणे काम करावे. रोख रक्कम आढळल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे रक्कम जप्त करणे व पुढील कारवाई करण्यात यावी, अशा सूचना निवडणूक खर्च निरिक्षकांनी केल्या.खर्चविषयक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या खर्च तपासणी पथक, व्हिडीओ तपासणी पथकांनी या दरम्यान काळजीपूर्वक काम करावे. या पथकातील सदस्यांना काही अडचणी असल्यास त्या समन्वयाने निकाली काढल्या पाहिजे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
सर्व मतदारसंघातील यंत्रणांवर बारकाईने लक्ष्य-जिल्हाधिकारी
यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी जिल्हा प्रशासनाच्या तयारीची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणेवर बारकाईने लक्ष्य ठेवले जात आहे. तसेच प्रशासनाने समन्वयाने जबाबदारी पार पाडण्याच्या सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोणातून पोलीस प्रशासन करीत असलेल्या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली.
