कामगारांच्या कल्याणासाठी कटिबद्ध- मंत्री ऍड. आकाश फुंडकर

0
16
मंगरूळपीर येथील सांस्कृतिक भवनात ४९६ कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वाटप उत्साहात संपन्न
वाशिम,दि.१९ एप्रिल – “कामगार हा आपल्या समाजाचा खरा कणा आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीच्या पायाभूत रचनेमध्ये कामगारांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांची आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक सुरक्षा ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. त्यांच्या गरजा ओळखून त्यांना सहाय्य करणाऱ्या विविध योजना राज्य सरकारकडून राबवण्यात येत आहेत. आज गृहोपयोगी वस्तूंचा संच वाटप केवळ वस्तू देण्यापुरता मर्यादित नाही, तर या माध्यमातून त्यांच्या जीवनात थोडासा दिलासा मिळावा, ही भावना यामागे आहे.
      शासन शेतकरी, कामगार, गरीब व सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून कार्य करत आहे. कामगार कल्याण योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री ऍड आकाश फुंडकर यांनी केले.
      आज दि.१९ एप्रिल रोजी मंगरूळपीर येथील सांस्कृतिक भवनात कामगार कल्याण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कामगार मंत्री ऍड. आकाश फुंडकर यांच्याहस्ते असंघटित क्षेत्रातील नोंदणीकृत ४९६ कामगारांना गृहोपयोगी वस्तूंच्या संचांचे वाटप करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
        व्यासपिठावर वाशिम-मंगरूळपीर  मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे, राजू पाटील राजे, सुरेश लुंगे, अशोक हेडा, नरेंद्र गोलेच्छा, वीरेंद्रसींह ठाकूर , डॉ. दिलीप रत्नपारखी, अनिल गावंडे, पुरुषोतम चितलांगे, विनोद जाधव,अभिषेक दंडे, रविंद्र ठाकरे,लाॅ.वसंत धाडवे, सतिश बाहेती, प्रमोद घोडचर  गोपाल लुंगे,सतीश राठी, सचीन पवार, मो.शारीक यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
     पूढे बोलतांना ऍड.श्री. फुंडकर म्हणाले, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक महत्त्वाचं आवाहन करायचं आहे – काही ठिकाणी दलाल, एजंट यांच्यामार्फत पैसे घेऊन लाभ मिळवून देण्याचे प्रकार समोर येत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी कोणालाही एक रुपयाही देण्याची गरज नाही. योजनांचा लाभ पारदर्शक पद्धतीने आणि विनामूल्य मिळतो. कुणी पैसे मागत असेल, तर अशा व्यक्तींविरोधात तात्काळ तक्रार करा. सरकार तुमच्या पाठीशी आहे. या योजनांचा लाभ घेणारे कामगार केवळ लाभार्थी नसून, समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणारे हात आहेत. त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे हे आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे. आजचा कार्यक्रम हाच संदेश देतो की सरकार तुमच्या पाठीशी आहे, आणि गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव सज्ज असल्याचे यावेळी म्हणाले.
      आमदार श्याम खोडे यांनी देखील बोलतांना सांगितले की, कामगार वर्ग हा आपल्या समाजाचा कणा आहे. त्यांच्या सक्षमीकरणासाठी अशा योजनांची गरज आहे व आपण सर्व स्तरावर कामगारांच्या पाठिशी आहोत.कधीही कोणतीही समस्या असल्यास सांगावी. असे प्रतिपादन केले.
        कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कामकार कल्याण आयुक्त पंकज खांडेकर यांनी कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे राबविण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती दिली.
इतर मान्यवरांनी देखील मनोगते व्यक्त केलीत.कार्यक्रमास कामगार विभागाचे अधिकारी कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी ,सामाजिक कार्यकर्ते, तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सुनिल मालपाणी यांनी केले तर उपस्थितांचे आभार आ.श्याम खोडे यांनी मानले.