विभागातील सहा आदर्श तलाठ्यांची निवड महाराष्ट्र दिनी होणार सन्मान

0
193

नागपूर/गोंदिया दि.30 : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय निवड समितीने नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यातून उल्लेखनीय कार्यासाठी एका आदर्श तलाठ्याची निवड केली असून 1 मे, महाराष्ट्र व कामगार दिनाच्या जिल्ह्यातील मुख्य शासकीय कार्यक्रमात विभागातील सहा आदर्श तलाठ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून नागपूर विभागातील सन 2024-25 साठी आदर्श तलाठी पुरस्काराकरिता 25 एप्रिल 2025 रोजी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यालयात आयोजित विभागीय निवड समितीने सहा जिल्ह्यातील प्रत्येकी एक प्रमाणे तलाठ्यांची निवड केली आहे. गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजीत नायर हे निवड समितीचे सदस्य तर विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त (महसूल) राजेश खवले सदस्य सचिव आहेत.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या तलाठ्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातून तहसिल कार्यालय सावनेर येथील संदिप आवळेकर, भंडारा जिल्ह्यातील लाखनी तहसिल कार्यालयातील श्रीमती पी. के. सांगोळकर, गोंदिया जिल्ह्यातून बिहारीलाल बिसेन, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तहसीलमधून प्रविण ठोंबरे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालूक्यातून रेणुका करंबे यांचा समावेश आहे. रुपये 5000/- चा धनादेश आणि प्रशस्तिपत्र असे, या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी 1 मे 2025 रोजी आयोजित होणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या विशेष कार्यक्रमात या सहा आदर्श तलाठ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय निवड समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त (महसूल) राजेश खवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

आदर्श तलाठी पुरस्कारासाठी निवड झालेल्या नागपूर विभागातील या समर्पित आणि कर्तव्यदक्ष तलाठ्यांचे त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिनंदन केले.