महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
गोंदिया, दि.1 : महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी आपल्या आयुष्याचे समर्पण करुन समाजसुधारणा घडवून आणल्या. त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच राज्याची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्राने गेल्या 65 वर्षात सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करुन विविध क्षेत्रात देशात अव्वल स्थान पटकाविले असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
पोलीस मुख्यालयाच्या कारंजा येथील मैदानावर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमीत्त ध्वजारोहण केल्यानंतर उपस्थितांना संबोधीत करतांना श्री.पाटील बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, माजी आमदार राजेंद्र जैन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. पाटील पुढे म्हणाले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया विस्तार करण्यात येणार आहे. तसेच गोंदिया ते बल्लारशाह या नविन रेल्वे मार्गाचे निर्माण होणार असल्यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे.
जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायतीने हवामान कृषी विशेष पंचायत पुरस्कार वर्ष 2023-24 करीता देशात प्रथम क्रमांक पटकावून राज्याचा गौरव वाढविला आहे. तसेच जानेवारी ते डिसेंबर 2024 या कालावधीत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने उत्तम कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम ठरला, ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे.
सहकार विभागामार्फत राज्यातील 12 हजार प्राथमिक कृषी पत पुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात येणार असून गोंदिया जिल्ह्यातील 121 सहकारी संस्थांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील नागरिकांना ऑनलाईन सुविधा पुरविण्याकरिता 79 सेवा सहकारी संस्थांकडे सी.एस.सी. सेंटरचे कामकाज प्रत्यक्षात सुरु झाले आहे.
गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. शासकीय आधारभुत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये 189 धान खरेदी केंद्रामार्फत 78 हजार 354 शेतकऱ्यांकडून 24 लाख 67 हजार 572 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत 560 कोटी 47 लाख 92 हजार रुपये अदा करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत भर पडावी यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-2 करीता जिल्ह्यातील 293 गावांची निवड करण्यात आली असून ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.
शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे ‘कंपोस्ट खड्डा भरु, आपले गाव स्वच्छ ठेवू’ हा उपक्रम आज 1 मे 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत 138 दिवस राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच आणि गावकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले. पुरुष व महिला पोलीस दल, पुरुष व महिला होमगार्ड पथक, माजी सैनिक पथक, पोलीस बँड पथक, पोलीस श्वान पथक, अग्नीशमन दल यांनी परेड संचलन केले.
कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला