अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील १८ गाव व नगरपंचायतीला तीन दिवस पाणीटंचाई

0
22

अर्जुनी मोरगाव,दि.०३- अर्जुनी मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १८ गाव आणि एक नगरपंचायत यांना नियमित पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदाच्या भीषण उन्हाळ्यामुळे तलावाच्या पाण्याची पातळी कमालीची खाली गेली असून, या योजनेच्या उपसा विहिरीत पाणी पोहोचवणारा कालवा देखील कोरडा पडल्याने गंभीर पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सदर योजनेचा आधार तलावावर असून, उपसा करणाऱ्या विहिरीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी कालव्याचा उपयोग केला जातो. परंतु सध्या तलावातील पाण्याची पातळी इतकी खाली गेली आहे की, कालव्यातून पाणी उपसण्यासाठी विशेष यंत्रणा वापरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आजपासून (३ मे) पुढील तीन दिवस संपूर्ण योजनेतील पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

योजनेचे अध्यक्ष किशोर तरोणे यांनी माहिती दिली की, “उपसा कालव्याचा काम हाती घेण्यात आले असून, तीन दिवसांच्या आत ही समस्या सोडवली जाईल. मात्र तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरावे.”या पाणीटंचाईमुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील लोकजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून जनतेला योग्य तो पर्याय व मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे