भंडारा : देशाच्या अन्नदात्याला आर्थिक संकटाने घेरले आहे. खरीप २०२४ मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धानाची शेती करणार्या शेतकर्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रांवर हमीभावाने (२,३०० रुपये प्रति क्विंटल) आपला माल विकला. पण, गेल्या १५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंतच्या १ हजार ३६ शेतकर्यांचे तब्बल १० कोटी २० लाख ७६५० रुपये थकले आहेत. या थकबाकीमुळे (Paddy Farmers) शेतकरी हतबल झाले असून, ‘पैसे कोणाकडे मागायचे?’ हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
खरेदी केंद्र सुरू होण्यास आधीच उशीर झाला. त्यात ऑनलाईन प्रक्रियेच्या जंजाळात शेतकर्यांना मनस्ताप सहन करावा लागला. धानाचे मोजमाप झाले, पण पैसे खात्यात जमा होण्याची वाट पाहत शेतकर्यांच्या आशा पाण्यात गेल्या. शासनाचे उदासीन धोरण शेतकर्यांना डिवचत असल्याची भावना वाढत आहे. ‘पैसे तातडीने मिळतील,’ या आशेने धान विकणार्या (Paddy Farmers) शेतकर्यांना आता आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे.
कृषिप्रधान देशात शेतकर्यांवर अन्याय होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. देशाची अर्थव्यवस्था शेतकर्यांच्या कष्टावर उभी असताना, त्यांच्याच हातात पैसा नाही. ऑनलाईन प्रक्रियेच्या नावाखाली खरेदी केंद्रांवर शेतकर्यांना ताटकळत ठेवले जात आहे. (Paddy Farmers) थकबाकीमुळे शेतकर्यांना पुन्हा खासगी सावकारांचा आधार घ्यावा लागण्याची भीती आहे. उदरनिर्वाहासाठी शेतकरी हताश झाले असून, त्यांच्यासमोर उपजिविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.शेतकरी वर्गातून आता संतापाची लाट उसळत आहे. लोकप्रतिनिधींनी तातडीने पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा करावा आणि अडकलेले १० कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा करावेत अशी मागणी जोर धरत आहे.
जिल्ह्यातील १ हजार ३६ शेतकर्यांचे १० कोटी २० लाख ७ हजार ६५० रुपयांची रक्कम थकीत आहे. शासनाकडून जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या खात्यात वर्ग झाली नाही. लवकरच ही रक्कम जमा करण्यात येईल.
-एस.बी.चंद्रे, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा