ऊषाकिरण आत्राम ताराम यांना ‘भाकरे महाराज स्मृती आदिवासी सेवक पुरस्कार 2025’ प्रदान

0
7

नागपूर,दिनांक13: आदिवासी साहित्यिक व समाजसेविका ऊषाकिरण आत्राम ताराम यांना गोवारी शहीद स्मारक समिती, नागपूर यांच्या वतीने ‘भाकरे महाराज स्मृती राज्यस्तरीय आदिवासी सेवक पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला.

हा सन्मान त्यांना त्यांचे साहित्य, सेवा, समाजकार्य तसेच गोंडीसह अन्य आदिवासी बोली-भाषांवर सातत्याने सुरु असलेल्या कार्याबद्दल देण्यात आला आहे. गोवारी शहीद स्मारक समितीचे अध्यक्ष शालिक नेवारे, सचिव शेखर लसुन्ते, संयोजक ज्ञानेश्वर राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आत्राम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना सन्मानपत्र, भाकरे महाराजांचे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविले.

आत्राम यांचे साहित्य महाराष्ट्रासह देशभरातील 10-12 विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून अनेक विद्यार्थी त्यांच्या सहित्यावर पीएच.डी. व एम.फिल. करत आहेत. त्यांच्या कविता, कथा, नाटक आदि साहित्य गोंडी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजीत अनुवादित झाले आहे. तसेच कथा इंग्रजी, बंगाली, मराठी, हिंदी आणि गोंडी भाषांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.

त्यांची ‘नत्तुरी किसी आम’ ही गोंडी कविता बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली गेली असून, हिंदी साहित्य अकादमी दिल्ली तर्फे आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आली आहे. त्यांना यापूर्वीही विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.आत्राम यांना भाकरे महाराज स्मृती ‘आदिवासी सेवक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल माणिक गेडाम, नंदकिशोर नेताम, किरण मोरे, रमेश कोरचा आदी साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.