
PM-ABHIM योजनेअंतर्गत सुरु झालेला महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प, गोंदिया जिल्ह्याच्या नागरिकांसाठी ठरणार संजीवनी
गोंदिया,दि.२३ः जिल्ह्यात आज ५० खाटांच्या क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकच्या भूमिपूजन समारंभाने एका नव्या युगाची सुरुवात झाली. हा रुग्णालय ब्लॉक भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना (PM-ABHIM) अंतर्गत उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त निधी मंजूर करण्यात आली आहे. या समारंभात गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जनप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
हा क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक केवळ गोंदिया जिल्ह्यासाठीच नव्हे, तर परिसरातील ग्रामीण भागासाठीही एक वरदान ठरेल. आरोग्यसेवांमध्ये हा एक ऐतिहासिक टप्पा असून आपत्कालीन आणि गंभीर उपचार सेवांना नवे आयाम मिळणार आहेत.दूरदृष्टी, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रशासकीय समन्वयामुळे हा महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रत्यक्षात येत असल्याचे आमदार अग्रवाल यांनी म्हटले आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर, अधिकारी, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, सरपंच बालकृष्ण बिसेन, दीपा चंद्रिकापुरे (कृषी व पशुसंवर्धन सभापती, जि.प.), राहुल मेश्राम (पंचायत समिती सदस्य, कुडवा), कमल फरदे (उपसरपंच) व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*योजनेचे मुख्य उद्दिष्ट:*
1. *आरोग्य व्यवस्था बळकट करणे* – जिल्हा स्तरावर हॉस्पिटलची क्षमता वाढवून रुग्णांना वेळेवर उपचार मिळणार.
2. *साथीच्या रोग व आपत्ती व्यवस्थापन क्षमता मजबूत करणे* – कोविडसारख्या संकटांना तोंड देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे.
3. *गंभीर वैद्यकीय सेवा सुलभ करणे* – गंभीर रुग्णांना नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये पाठवण्याची गरज नाही.
4. *ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सक्षम करणे* – प्राथमिक व उपकेंद्रांना आधुनिक उपकरणांशी जोडणे.