
अहेरी, दि. २4मे – गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी अहेरी तालुक्यातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी आज अहेरी तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित केली. या बैठकीत शासकीय योजना, अपूर्ण असलेली विकासकामे, आदिवासी व मागासवर्गीय भागातील मूलभूत सुविधांचा अभाव, तसेच स्थानिक पातळीवरील प्रशासनिक अडचणी यावर आढावा घेतला.
या बैठकीस गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आदिवासी जिल्हा सेल अध्यक्ष हनुमंत मडावी, अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. निसार हकीम, तहसीलदार अहेरी सूर्यवंशी साहेब, गटविकास अधिकारी जुवारे साहेब, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, माजी सरपंच अजय नेताम, सामाजिक कार्यकर्ते अरुण बेईतिलवार, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रिजवान शेख, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष राहुल आईलवार तसेच राजू कुरेशी, बबलू सडमेक, गणेश उपलपवार, रामप्रसाद मुसमकर, गजानन झाडे, प्रशांत अडचेवार, हतिक शेख, भीमराव करमकर, सत्यवान आलाम, सलाम शेख, हरिदास सडमेक, पुरुषोत्तम गरगम आणि सौ. उषाताई आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत अहेरी परिसरात आरोग्य सुविधा, रस्त्यांची दुर्दशा, जलसंधारण प्रकल्पांचे अपूर्ण काम, विज वितरण कंपनीची कार्यप्रणाली, शैक्षणिक संस्था आणि शेतीसंबंधित अडचणी यावर सखोल आढावा घेऊन नसगरिकांच्या समस्या उजागर करुन त्यांचे निराकरण करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या, वनहक्काचे प्रलंबित प्रकरणे आणि रोजगार हमी योजनेतील अपारदर्शकता यावर अधिक भर देण्यात आला.
खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी यावेळी सांगितले की, अहेरी तालुका हा दुर्गम आणि आदिवासीबहुल असून येथील विकास ही त्यांची प्राथमिकता आहे. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा आपण संसदेत आवाज उठवू असेही ते म्हणाले.बैठकीच्या शेवटी सर्व प्रतिनिधींनी आपल्या सूचना मांडल्या आणि एकात्मिक विकासाच्या दिशेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.