
वाशिम, दि.२४ मे-चिया हे वाशिम जिल्ह्याच्या ‘आकांक्षित’ ते ‘प्रेरणादायी’ या प्रवासातील उत्कृष्ट उदाहरण होय.
जिल्ह्याने चिया बीज शेतीत घेतलेली ही क्रांतिकारी झेप संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी आहे. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्या नेतृत्वाखाली जलसंधारण, चिया शेती आणि शाश्वत विकासाच्या दिशा दिल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. जलतारा उपक्रम आणि चिया शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोचण्यास मदत झाली आहे. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचे इतर जिल्ह्यांनीही अनुकरण करावे, अशी अपेक्षा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली. दि.२२ मे रोजी मंत्रालय येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा आणि आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे उपस्थित होत्या.
कृषी मंत्री पुढे म्हणाले, जलतारा आणि चियाचा हा अभिनव प्रयोग संपूर्ण राज्यात आपण राबविणार आहोत. त्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढेल, सिंचन क्षेत्र वाढेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक स्थिर व शाश्वत होईल. कृषी विभाग यासाठी आवश्यक धोरणात्मक पाठबळ देईल.
वाशिम जिल्हा हा महाराष्ट्रातील आकांक्षित जिल्ह्यांपैकी एक असून शेती हा जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय आहे. मात्र येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. खरीप हंगामात सोयाबीन, तूर आणि कापूस ही मुख्य पिकं असून, रब्बी हंगामात हरभरा व गहू घेतले जातात. पारंपरिक पिकांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना बाजारभाव आणि उत्पादन खर्चामुळे फारसा नफा मिळत नव्हता. हे लक्षात घेता जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या नेतृत्वाखाली अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत.
वाशिम जिल्ह्यात जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणासाठी जलतारा उपक्रम सुरू करण्यात आला. एका शोषखड्ड्याद्वारे ३.८० लाख लिटर पाणी मुरवता येते. त्यामुळे सिंचनाची उपलब्धता वाढून उत्पन्न दुप्पट होण्याची शक्यता आहे. मनरेगाच्या माध्यमातून ७५ हजार ३९६ शोषखड्ड्यांचे काम सुरू असून, यासाठी ३७.६९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या चळवळीत सामाजिक संस्थांचा सक्रिय सहभाग आहे. गाव पाणीदार होण्यासाठी २४ तालुकास्तरीय आणि १ हजार ४५० गावसभांचे आयोजन करण्यात आले आहे.
चिया शेतीने उभा केला यशाचा नवा इतिहास :
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी चिया पीकाची संकल्पना मांडली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेल्या चिया पिकामुळे शेतकऱ्यांना उच्च उत्पन्न मिळत आहे. वाशिमचे हवामान चिया शेतीस अनुकूल असून २०२२-२३ मध्ये १६२ हेक्टरवरून २०२४-२५ मध्ये ३६०८ हेक्टरवर चिया लागवड वाढली आहे. एका पायलीमागे ४.८१ रुपये नफा देणारे हे पीक हरभरा व गहूपेक्षा अधिक फायदेशीर ठरले आहे.
कृषी विभाग, आत्मा आणि विविध संस्थांच्या माध्यमातून चिया शेतीचा प्रचार झाला. वाशिममध्ये समृद्धी ऑर्गेनिक फार्म्ससोबत करार करून शेतकऱ्यांना १४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळवून देण्यात आला. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत एका क्विंटलला २३ हजार रुपयांचा उच्चांकी दर नोंदवला गेला. याशिवाय चिया पीकाची पूर्ण मूल्यसाखळी विकसित करून शेतकऱ्यांना ब्रँडिंग, प्रक्रिया आणि विक्रीसाठी ‘वाशिम शेतीशिल्प’ उपक्रमातून संधी उपलब्ध करून दिली जात आहे.
राष्ट्रीय स्तरावर वाशिमचा गौरव
नीति आयोगाच्या जनरल कौन्सिलमध्ये वाशिम जिल्ह्याच्या “चिया क्रांती”ची निवड “आकांक्षित जिल्हा” प्रतिनिधी म्हणून झाली. तसेच वाशिम जिल्हा कृषी उत्पन्नात राष्ट्रीय आघाडीवर गेला असून जिल्ह्याला “राजीव गांधी गतीमानता अभियानांतर्गत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार”ही मिळाला आहे.
हे सगळे उपक्रम प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करा’ या संकल्पनेला अनुसरून राबवले जात असून, वाशिम जिल्हा हे ‘आकांक्षित’ ते ‘प्रेरणादायी’ या प्रवासातील उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.अशी प्रतिक्रिया श्री.कोकाटे यांनी यावेळी दिली.