
प्रफुल्ल पटेल यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाकडून हालचाल
अर्जुनी मोरगाव,दि.२५: इटियाडोह प्रकल्पातील पाण्यापासून वंचित असलेल्या कोहलगावला अखेर झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळणार आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मध्यस्थीने हा विषय मार्गी लागला असून खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर प्रशासनाकडून हालचाल सुरू झाल्याचे दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील महत्त्वाकांक्षी झाशीनगर उपसा सिंचन योजनेंतर्गत २५ दशलक्ष घनमीटर पाणी इटियाडोह प्रकल्पातून प्रकल्पग्रस्त १२ गावांना देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोहलगाव येथील शेतकऱ्यांनी शेतातून कालवा खोदकामास विरोध केल्यामुळे कोहलगावला या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. परिणामी, यंदा सुरू झालेल्या पाणीपुरवठ्यापासून कोहलगाव हे गाव वंचित राहिले. या पार्श्वभूमीवर कोहलगाव येथील सरपंच, सदस्य आणि शेतकऱ्यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली. त्यांनी कोहलगाव या गावाला झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी पाइपलाइनद्वारे पुरविण्याची मागणी केली. या मागणीची गंभीर दखल घेत खासदार पटेल यांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. यानंतर कार्यकारी अभियंता अमृतराज पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे कोहलगाव येथील शेतीला झाशीनगर उपसा सिंचन योजनेचे पाणी देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने तत्काळ हालचाल सुरू केल्याचे स्थानिक स्तरावर दिसून येत आहे. या निर्णयामुळे कोहलगावच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, सिंचनाची समस्या दूर होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करीत खासदार प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहे.