
गोंदिया-सर्व शासकीय कार्यालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे, त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे.
दिनांक 23 मे रोजी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया च्या वतीने 1 मे ते 15 जून तंबाखू नकार दिनानिमित्त 45 दिवसाच्या अभियाना अंतर्गत जयस्तंभ चौक येथील प्रशासकीय ईमारतीतील कार्यालयात धाडसत्र राबवुन धूम्रपान निषिद्ध क्षेत्राचा व तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांचे पोष्टर वाटप करुन जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अमलबजावणीसाठी आरोग्य विभागामार्फत पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.सर्व शासकीय कार्यालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ बाळगणे,त्यांचे सेवन करण्यास मनाई आहे.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयांची तपासणी करण्यात येत आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनात जयस्तंभ चौक येथील प्रशासकीय ईमारतीतील कार्यालयात विविध विभागात धाड टाकून 27 कर्मचारी व लोकांकडुन तंबाखू, गुटखा खाणाऱ्या व बाळगणाऱ्यावर तंबाखू नियंत्रण कोटपा कायदा 2003 अंतर्गत दंडात्मक कारवाई करून 4250/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत,तहसीलदार समशेर पठाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे, जिल्हा सल्लागार डॉ.ज्योती राठोड, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, दंत सहाय्यक विवेकानंद कोरे यांचेसह पोलीस विभागाचे बक्कल क्रमांक 1815 पोलीस हवलदार लेविस घरत पो.स्टे. गोंदिया शहर यांनी पार पाडली.सदर धाडसत्र तंबाखू नकार दिनानिमित्ताने 1 मे ते 15 जून या 45 दिवसाच्या अभियाना अंतर्गत राबविण्यात आली.