शहरातील 54 जिर्ण इमारतींना मनपाची नोटीस

0
19

चंद्रपूर 27 मे  – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा संभाव्य धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरवात केली असुन मागील काही दिवसात 54 जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली आहे.
पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारतींचा सर्व्हे करण्यात येतो. यात आढळलेल्या धोकादायक इमारतीतील रहिवाश्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 चे कलम 264 अन्वये नोटीस जाहीर करण्यात येते. चंद्रपूर मनपातर्फे झोन 1 अंतर्गत 28, झोन 2 अंतर्गत 16 तर झोन 3 अंतर्गत 10 अश्या एकुण 54 धोकादायक इमारतींना नोटीस देण्यात आली आहे.
नोटीसनुसार धोकादायक इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व व्यक्तींना व महत्वाचे साहित्य अन्यत्र सुरक्षित ठिकाणी तात्काळ स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले असुन त्वरित आपल्या इमारतीची दुरुस्ती करुन घेण्याचे तसेच त्यांनतर आपल्या इमारतीचे नोंदणीकृत स्ट्रक्चरल अभियंता यांचेकडून सर्वेक्षण करुन त्याबाबतचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मनपा कार्यालयास सादर करण्यास कळविण्यात आले आहे.
पावसाळ्यापूर्वी सदर कारवाई दरवर्षी मनपातर्फे करण्यात येते मात्र काही मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. मग अश्या प्रसंगी निष्कासीत करण्याची अथवा नियमानुसार कारवाई मनपातर्फे करण्यात येते.