
– मुंबई येथे ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार
गोंदिया – सन 2022-23 या वर्षात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराचे मानकरी ठरलेले सडक अर्जुनी तालुक्यात कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार डूलीराम पटले यांचा आज 27 मे रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पंचायत राज पुरस्कार वितरण कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद स्तरावर अति उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातून एक ग्रामपंचायत अधिकारी यांना शासन स्तरावरून यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याच अनुषंगाने सन 2022-23 करिता गोंदिया जिल्ह्यातून सडक अर्जुनी तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार पटले यांची निवड करण्यात आली होती. आज 27 मे रोजी मुंबई येथे सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पंचायत राज पुरस्कार सोहळ्याचे आयोजन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सन 2022-23 च्या राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराने राजकुमार पटले यांना सपत्नीक पुरस्कृत करण्यात आले.