बालविवाह थांबविण्यास प्रशासनाला यश

0
15

गोंदिया, दि.5 : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महिला व बाल विकास अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील मेंदीपूर ढिवरटोला येथे एका 15 वर्षीय बालिकेचे नियोजित बाल विवाह थांबविण्यात आले.  मागील तीन वर्षात एकूण 13 बालविवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले.

2 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजता रितीरीवाजानुसार विवाह नियोजित करण्यात आले होते. विवाह स्थळी वधु पक्षाकडील पाहुणे वधुच्या घरी हजर झाले होते. लग्न मंडप व जेवण तयार झाले होते. याविषयी गावातील स्थानिकांना गुप्त माहिती मिळताच विवाहाच्या ठिकाणी गेले आणि बालिकेचे आधारकार्ड व टी.सी. यावरुन बालिकेची वय तपासणी केली असता बालिकेची वय ही 15 वर्ष 05 महिने एवढी होती. त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्यांना समजावून सांगितले की, हा विवाह बालविवाह आहे आणि बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा त्वरित थांबवा आणि वर पक्षाला लगेच फोन करुन कळवा की, बालिकेची वय कमी असल्याने हा विवाह सोहळा थांबविण्यात येते अशी सूचना दिली.

प्रथम बालिकेचे नातेवाईक एैकून घेण्यास तयार नव्हते. परंतु त्यांना बालविवाह कायदा या विषयाची माहिती दिली असता बालिकेच्या मामाने वर पक्षाला फोन करुन सांगितले की, ते वरात घेऊन येणार नाही ते जिथे आहेत तिथेच थांबवा, त्यामुळे विवाह स्थळी वर पक्ष हजर झालेला नाही. सदर बालिकेचे आई व वडील नसून दोघेही काही वर्षापूर्वी आजाराने मरण पावले, त्यावेळी बालीकेची वय 06 महिने होती. तेव्हापासून तिचे मामा आणि आजी हे बालिकेचे पालन पोषण करीत आहेत. बालिकेची मावशी हिने हे स्थळ शोधले व प्रथम पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुलगा चांगला आहे म्हणून बालिकेने सुध्दा होकार दिले व नंतर साक्षगंध झाले व 2 जून 2025 रोजी विवाहाची तारीख होती.

प्रथम गावातील स्थानिकांनी विवाह स्थळी पोहचून चौकशी करुन नंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत बाल संरक्षण कक्ष गोंदिया, दामिनी पथक व इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी गोंदिया यांना नियोजित बालविवाह विषयी माहिती दिली असता जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, संरक्षण अधिकारी मुकेश पटले, समुपदेशक मनिषा मोहुर्ले, धर्मेंद्र भेलावे, तसेच इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे प्रमुख अशोक बेलेकर, ज्ञानेश्वर पटले, दिपमाला भालेराव तसेच दामिनी पथकाचे पुजा सुरळकर, प्रशांत बंसोड, वैशाली भांदकर, पुनम मंजुरे, प्रिती बुरेले व सुवर्णा मडावी यांनी संयुक्तपणे विवाह स्थळी जावून नियोजित बाल विवाह थांबविले.मागील तीन वर्षात एकूण 13 बालविवाह थांबविण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले. यामध्ये दोन बाल विवाहामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. या तीन महिन्यात पोक्सो प्रकरणात एकूण 28 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.