
गोंदिया,दि.०७ः शहरातील शास्त्री वॉर्ड येथील सावरी बाजीराव भोतमांगे या सिकलसेल सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त चिमुरडीला वेळोवेळी रक्ताची गरज भासते. हा असा आजार आहे ज्यामध्ये नियमितपणे रक्त चढवणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.
अलीकडेच रक्तबँकांमध्ये रक्ताची तीव्र कमतरता भासू लागल्याने भोतमांगे कुटुंबाला मोठ्या चिंतेला सामोरे जावे लागले. या कठीण प्रसंगी सावरीच्या वडिलांनी रक्तमित्र विनोद चांदवानी (गुड्डू) यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच विनोद चांदवानी यांनी उशीर न करता आपल्या नियमित रक्तदात्यांच्या यादीतील रोहित रंगलानी यांच्याशी संपर्क साधला.रोहित रंगलानी यांनी माणुसकीचे दर्शन घडवत लोकमान्य ब्लड बँक येथे त्वरित रक्तदान करून चिमुरडीचे प्राण वाचवले.
या मानवीय व प्रेरणादायक कार्याबद्दल विनोद चांदवानी (गुड्डू), नितीन रायकवारे व रखी चौहान यांनी रोहित रंगलानी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.भोतमांगे कुटुंबीयांनी या मदतीसाठी रोहित रंगलानी आणि विनोद चांदवानी (गुड्डू) यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांना “मौन योद्धा” ही उपाधी बहाल केली.मानवसेवा हाच खरा धर्म आहे. हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.