
ऐवर ग्रीन सोशल असोसिएशन ला मिळाले यश
चित्रा कापसे/तिरोडा,दि.११-गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मासेमारीसह जलाशय शेतीच्या सिंचनासाठी देखील उपयुक्त आहेत. या जलाशयांचा मोती उत्पादनासाठी देखील वापर होवू शकतो, हे ओळखून एव्हरग्रीन सोशल असोसिएशन तिरोडा या संस्थेने गोड्या पाण्यातून पर्ल शेतीला सुरवात केली.त्यास चांगलेच यश आले असून पहिल्या मोत्यांच्या पीकातून गणेशाची प्रतिकृती साकारण्यात आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
नागपूर येथे झालेल्या २०२४ या वर्षी अॅडव्हांटेज विदर्भ प्रदर्शनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत या संकल्पनेची माहिती पोहोचवण्यात आली. या शेतीमुळे रोजगाराची संधी वाढणार असून, पाण्याचे शुद्धीकरण, पर्यावरणाचे संतुलन, हस्तकलेचे उत्पादन आणि निर्यातक्षम उद्योग यामध्येही मोठी भर पडणार आहे.“शिंपल्यातून मोती मिळतो, पण प्रयत्नातून यश मिळते” या उक्तीला खरं करत तिरोडा येथील एव्हरग्रीन सोशल असोसिएशनने मोती शेतीच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. विशेष म्हणजे या संघटनेने तयार केलेला पहिला मोती गणेशाच्या आकृतीचा असून, तो शुद्ध गोड्या पाण्यात तयार करण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील हा पहिला आणि ऐतिहासिक मोत्याचा पीक असल्याने या उपक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.मोठ्या प्रमाणावर गोड्या पाण्याचे तलाव, विहिरी आणि जलसाठे उपलब्ध आहेत. या नैसर्गिक संपत्तीचा सकारात्मक उपयोग करत एव्हरग्रीन सोशल असोसिएशनचे संस्थापक सुबोध बैस व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या सहा वर्षांपासून संशोधनात्मक काम सुरू केले. सुरुवातीला अनेक अडचणी, आर्थिक चणचण, पाण्याचे नियोजन, योग्य शिंपले निवडणे यांसारख्या समस्या आल्या. मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी सीता संस्थेकडून घेतलेले प्रशिक्षणाचा आधारावर अभ्यास आणि प्रत्यक्ष तलावातील प्रात्यक्षिक यांचा समन्वय साधत २०२५ मध्ये पहिले पीक घेण्यात यश मिळवले.
पर्ल शेती म्हणजे काय?
मोती तयार करण्याच्या प्रक्रियेला पर्ल कल्टिव्हेशन किंवा पर्ल फार्मिंग म्हणतात. यात गोड्या अथवा खाऱ्या पाण्यातील विशिष्ट प्रकारच्या शिंपल्यात कृत्रिमरित्या न्यूक्लियस (बीज/आधार) ठेवून, काही महिन्यांत त्याभोवती मोती तयार होतो. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि कौशल्यपूर्ण आहे. शिंपले पाण्यात सातत्याने ठेवावे लागतात, तापमान, स्वच्छता आणि पोषण यांचे काटेकोर व्यवस्थापन आवश्यक असते.
रोजगार आणि पर्यावरणपूरक शेती
शिंपले पाण्याचे नैसर्गिक फिल्टर असतात. ते जलशुद्धीकरणात मदत करतात आणि जलपरिसंस्थेतील पर्यावरण संतुलन राखतात. त्यामुळे पर्ल शेती ही केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नाही, तर पर्यावरणपूरक शेती म्हणूनही उदयाला येत आहे.याशिवाय, या शेतीमुळे स्थानिक शेतकऱ्यांना, महिला बचत गटांना, युवकांना, हस्तकला उत्पादकांना थेट रोजगाराच्या संधी प्राप्त होतात.
शिंपल्यांपासून ३५० वस्तूंची निर्मिती
एव्हरग्रीन सोशल असोसिएशनने केवळ मोती उत्पादनावरच लक्ष केंद्रित न करता, शिंपल्यांचे ३५० प्रकारचे हँडीक्राफ्ट तयार करण्याचा उपक्रमही हाती घेतला आहे. यामध्ये घर सजावटीच्या वस्तू, दागदागिने, बटणे, भेटवस्तू, शो-पीस यांचा समावेश होतो. या वस्तूंना भारताबरोबरच परदेशांतही मोठी मागणी असून, स्थानिक उत्पादनातून विदर्भात निर्यातक्षम उद्योग निर्माण करण्याचा संघटनेचा मानस आहे.
डिझायनर ज्वेलरी क्षेत्रात उडी
संघटनेचे पुढचे पाऊल म्हणजे डिझायनर मोत्यांपासून ज्वेलरी निर्मिती करणे. गोल, अर्धगोल, धार्मिक आकृतीचे मोती वापरून आकर्षक लॉकेट, नेकलेस, ब्रेसलेट, रिंग्ज आदी तयार करण्याचा मानस आहे. यामुळे स्थानिक महिला व तरुणांना घरबसल्या काम व व्यवसाय मिळणार आहे.