
गडचिरोली,- नक्षल्यांना मदत करीत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी अटक केलेले व सध्या जामीनावर असलेले दिल्ली विद्यापीठाचे प्रो.जी.एन.साईबाबा यांच्या प्रकरणाची सुनावणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु असून, सरकारी पक्षातर्फे सर्व साक्ष पुरावे तपासल्यानंतर आज पुरावे पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.
गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे प्रा.जी.एन.साईबाबा यांना ९ मे २०१४ अटक केली होती. ४ एप्रिल २०१६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर प्रा.साईबाबा कारागृहाबाहेर आले. मात्र तत्पूर्वीच २७ ऑक्टोबर २०१५ पासून साईबाबा प्रकरणाची सुनावणी गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु करण्यात आली. ही सुनावणी आताही सुरु असून, आज सरकारी पक्षातर्फे सर्व साक्ष पुरावे तपासून पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रा.साईबाबा यांच्या वकिलांनी साक्षदारांची उलटतपासणी घेतली. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्टला घेणार असल्याचे जाहीर केले. सरकारी पक्षातर्फे अॅड.सत्यनाथन व अॅड. सचिन कुंभारे यांनी काम पाहिले, तर प्रा.जी.एन.साईबाबा यांच्यातर्फे अॅड. सुरेंद्र गडलिंग व अॅड.जगदीश मेश्राम यांनी युक्तीवाद केला.