Home विदर्भ शहर विकासासाठी २० कोटींचा निधी मंजूर

शहर विकासासाठी २० कोटींचा निधी मंजूर

0

गोंदिया – गोंदिया नगरपरिषद अंतर्गत रस्ते बांधकाम व इतर विकासकामांसाठी राज्य शासनाने २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात नगर विकास विभाग अंतर्गत विशेष रस्ता अनुदान निधी १० कोटी तर वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी १० कोटीचा निधी असा एकूण २० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे. गोंदिया शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नानाभाऊ पटोले, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांचे आभार नगराध्यक्ष कशिश जायस्वाल व भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी मानले आहे.
वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर १० कोटीच्या निधीत शहरातील विविध प्रभागात प्रस्तावित कामे होणार आहेत. यात प्रामुख्याने संत रविदास महाराज सांस्कृतिक भवन, विविध दुकाने, व्यापारी संकुल, दवाखाना इमारत, जनकनगर ग्राऊंड, लायब्ररी मल्टिप्लेक्स इमारत, गौतमनगर प्ले ग्राऊंड, मनोहर म्युनिसिपल हायस्कुल, प्रभाग क्रमांक ६ मध्ये टाकी, मराठी व हिंदी प्राथमिक शाळा, जयस्तंभ चौकात बसस्थानक आदींचा समावेश आहे. तर विशेष रस्ता अनुदान निधी अंतर्गत मंजूर १० कोटीतुन नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रभागात रस्ते बांधकाम करण्यात येणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय २४ ऑगस्ट रोजी निघाले आहे. नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या नेतृत्वात शहरातील विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

Exit mobile version