
देवरी,दि.28 : देवरी येथील ग्रामीण रुग्णालयाचे पडलेले छत आणि आरोग्यविषयक इतर सुविधांसंदर्भात आ.संजय पुराम यांनी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याशी चर्चा केली.सन १९९0 साली देवरी ग्रामीण रुग्णालयाची स्थापना झाली तेव्हापासून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कुठलीही सुधारणा झाली. एवढेच नाही तर बदलत्या काळानुसार रुग्णसोयीसाठी शासनाने नवीन उपकरणांची व्यवस्था केली, परंतु त्याला हाताळणारे चालक (ऑपरेटर) मात्र अजुनही या ठिकाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे सदर उपकरणांचा रुग्णांना पाहिजे तेवढी मदत होत नाही. याबाबत क्षेत्राचे आ.पुराम यांनी राज्याचे आरोग्यमंत्री सावंत यांच्याशी यापूर्वीही चर्चा करीत पाठपुरावा केला.परंतु अजुनपर्यंत शासनाने प्रशासनाला कुठलेही निर्देश दिले नाही. उलट दिवसेंदिवस देवरी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे छताचे पापुद्रे खाली पडत असल्याने यातून अपघात होऊ शकतो, ही बाब सोमवारी ना.सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली.
देवरीत नवीन इमारत व उपजिल्हा सामान्य रुग्णालयाचा दर्जा लवकरात लवकर मंजुर करण्यात यावा, असे स्मरणपत्र देण्यात आले. ना.सावंत यांनी विभागीय आरोग्य संचालक नागपूर व जिल्हा शल्य चिकीत्सक गोंदिया यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून प्रस्ताव सादर करून त्यांना तसा अहवाल सादर करा असे निर्देश दिले.