नागपूर,दि.06 : अनेक वर्षांपासून निवडणुका आल्या की पट्टेवाटप करण्याचे आश्वासन मिळायचे. परंतु निवडणुका संपल्या की झोपडपट्टीवर बुलडोझर फिरविणाऱ्या काँग्रेस नेत्यांना गेल्या ४० वर्षांत जे शक्य झाले नाही ते भाजप सरकारने दोन वर्षांत करून दाखविले. परंतु याचे श्रेय पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना जाते. पट्टेवाटपासाठी त्यांनी मंत्रालयात सतत पाठपुरावा केला. माझ्या व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून विकास कामे मार्गी लावले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मी त्यांना ‘कार्यसम्राट’अशी उपाधी देत असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. पूर्व नागपुरातील डिप्टी सिग्नल येथील पट्टेवाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
पूर्व नागपुरात कोट्यवधींच्या निधीतून विकास कामे सुरू आहेत. लवकरच ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत, अशी ग्वाही देत नितीन गडकरी यांनी कृष्णा खोपडे खऱ्या अर्थाने विकासाचे भागीरथ असल्याचे सांगितले. त्यांना अपेक्षित असलेले पट्टेवाटप, पारडी पूल, अनधिकृत ले-आऊ टचा विकास, क्रीडा संकुल आदी शासनाने घेतला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, प्रा. अनिल सोले, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर आदी उपस्थित होते.