तिरोडा दि.10–: तालुक्यातील सेलोटपार गट ग्रामपंचायतमधील खैरी येथील ११ हेक्टर जमिनीवरील मामा तलावाची मालकी भंडारा जिल्हा परिषदेकडे होती. जिल्हा वेगळा होवून १७ वर्षे पूर्ण होवूनही तलावाचे विविध लाभ जि.प. भंडारा घेत होते. याबाबत जि.प. सदस्य रजनी मिलिंद कुंभरे यांनी स्थायी समिती जिल्हा परिषद गोंदिया येथे हा मुद्दा उचलून धरला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले व त्या मामा तलावाचे लाभाधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया यांंना दिल्याचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा यांनी दिले.
भंडारा व गोंदिया जिल्हा १ मे १९९९ मध्ये वेगळे झाले. नियमानुसार ज्या-ज्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात येणारी शासकीय मालमत्ता त्या-त्या जिल्हा परिषदेला देणे गरजेचे होते. परंतु खैरी येथील मामा तलाव ११ हेक्टर जमिनीवर पसरलेला असून त्यावर आतापर्यंत भंडारा जिल्हा परिषदेची मालकी होती. त्या तलावाचे लिलाव भंडारा जि.प. करीत होते. त्याचे सर्व आर्थिक लाभाधिकार भंडारा जिल्हा परिषदेकडे होते.जि.प. सदस्य रजनी कुंभरे यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीत ही बाब उचलून धरली. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले व हे मामा तलाव जि.प. भंडाराकडून पत्र (भंजिप/लपा/ता-१/२१४/२०१७, कार्यालय लघू सिंचन विभाग, जि.प. भंडारा, दि.२/२/२०१७) अन्वये हस्तांतरित करून आर्थिक लाभाचे सर्व अधिकार जिल्हा परिषद गोंदियाला देण्यात आले.