Home विदर्भ सार्वजनिक हितासाठी संघटन बळकट करा- ग.दी.कुलथे

सार्वजनिक हितासाठी संघटन बळकट करा- ग.दी.कुलथे

0

गोंदिया,दि.२५ : शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वयातून करावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करीत असतांना सार्वजनिक हितासाठी आपले संघटन बळकट करावे. असे आवाहन राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य मार्गदर्शक ग.दी.कुलथे यांनी केले.२४ मे रोजी जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची सभा जिल्हा कोषागार कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.प्रमोद रक्षमवार, संवाद सचिव माधव झोड, सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
श्री.कुलथे पुढे म्हणाले, राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबीत आहेत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या १२ ते १४ जुलै दरम्यान लाक्षणिक संप पुकारण्याचा निर्णय अधिकारी व कर्मचारी संघटनेने घेतला आहे. अधिकारी व कर्मचारी काम करीत असतांना त्यांना मारहाण व दमदाटी करणाऱ्याला आता २ ऐवजी ५ वर्षाची शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून एकत्र असले पाहिजे. आपल्या मागण्या सोडविण्यासाठी संघटन हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आपला महासंघ हा राजकारणापासून अलिप्त असल्याचे सांगून श्री.कुलथे म्हणाले, केंद्रात व २२ राज्यात सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ही ६० वर्षाची आहे. त्याचप्रमाणे राज्यात सुध्दा सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरुन ६० वर्ष करावी. त्याचप्रमाणे ५ दिवसाचा आठवडा करणे, बालसंगोपन रजा वाढविणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे, ७ वा आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करणे यासह अनेक आपल्या मागण्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने बांद्रा येथे राजपत्रित अधिकारी महासंघास १३८१ चौ.मीटर आकाराचा भूखंड १ रुपये नाममात्र दराने उपलब्ध करुन दिला आहे. या बांधकामासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी सढळ हस्ते मदत करावी असे सांगून श्री.कुलथे म्हणाले, मुंबई येथे कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही दिवस निवासासाठी ही वास्तू उपयोगात येणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी डॉ.रक्षमवार यांनीही मार्गदर्शन केले. सभेला जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रदिपकुमार बडगे, राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लिलाधर पाथोडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ.के.पी.पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.आर.टेंभूर्णे, डॉ.सी.डब्ल्यू वंजारे, डॉ.एन.एस.येरणे, डॉ.अनंत चांदेकर, डॉ.पी.एस.खंडागळे, डॉ.बी.आर.पटले, डॉ.एस.पी.रहांगडाले, डॉ.आर.आर.कोठाडे, डॉ.मनोज राऊत, उपमुख्य लेखाधिकारी व्ही.ए.जवंजाळ, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एस.एस.भिमटे, लेखा अधिकारी एस.एस.मसराम, डॉ.के.के.सरजर, रोजगार अधिकारी आर.एन.माटे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, डॉ.वेदप्रकाश चौरागडे, डॉ.एस.यु.हुमणे, लेखाधिकारी एल.एच.बावीस्कर, अप्पर कोषागार अधिकारी पी.डी.पारधी, डॉ.एस.बी.पटेल, सहायक गटविकास अधिकारी एस.एस.वाघाये आदिंची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.आर.टेंभूर्णे यांनी मानले.

Exit mobile version