Home विदर्भ मेळघाटामधील विकास कामांना प्राधान्य द्या-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मेळघाटामधील विकास कामांना प्राधान्य द्या-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. ११ : सर्वांसाठी घरे, कृषी पंप वीज जोडणी, जलयुक्त शिवार योजना, धडक सिंचन विहीरी, मागेल त्याला शेततळे, विविध आवास योजना या लोककल्याणकारी योजना असून, सर्व स्तरातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे या योजनांची कामे गतीने पूर्ण करावी, तसेच मेळघाटमधील कुठलेही काम अपूर्ण राहता कामा नये. तेथील विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. विधानभवनातील मंत्रीमंडळ सभागृहात झालेल्या अमरावती जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, वीरेंद्र जगताप, बच्चू कडू, रवी राणा, रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर व श्रीमती यशोमती ठाकूर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, अप्पर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी जिल्ह्यातील कामांबाबत सादरीकरण केले. त्यानुसार धडक सिंचन विहीरी, जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, कर्जमाफी, कृषी व आवास योजना आदींचा आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी घेतला.
धडक सिंचन विहिरी योजनेनुसार ७५ टक्के काम पूर्ण झाले असेल तर तात्काळ निधी वितरित करावा. देयके रखडू नयेत. या योजनेचा संपूर्ण निधी मुदतीत खर्च व्हावा, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळेङ्क योजनेत ४५०० इतक्या उद्दिष्टापैकी १७९० पूर्ण झाले. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. या कामाला गती द्यावी. जलयुक्त शिवार योजनेत खारपाणपट्ट्यात २७ गावातील २४६ कामे, तर एकूण ३६०२ कामे पूर्ण झाली आहेत. खारपाणपट्ट्यात ही योजना अधिक प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सर्व नैसर्गिक जलस्त्रोतांचा एकत्रित विचार
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नद्या, छोटे नाले, बंधारे यांच्या एकत्रित रचनेतून जलयुक्त शिवार योजना अधिक परिणामकारक करता येईल. अशा प्रकल्पाची छोट्या नद्या, ओहळ हे सगळे विचारात घेऊन शास्त्रीय दृष्टीने आखणी करावी. कमी खर्चात ही कामे कशी करता येतील, हे अभ्यासावे. जिल्हा नियोजन समितीने प्राप्त निधी पूर्ण खर्च केला पाहिजे. आवश्यक असल्यास आणखी उपलब्ध करुन देऊ.

रस्त्यांसाठी वनविभागाची परवानगी प्रक्रिया पूर्ण करा
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत मेळघाटातील कोअर व बफर क्षेत्रातील चार कामे वनविभागाच्या परवानगीअभावी प्रलंबित आहेत. परवानगीअभावी अपूर्ण असलेल्या सर्व कामांचा एकत्र विचार करून परवानगी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. अचलपूर येथील पोलीस प्रशासकीय कार्यालय व निवास काम ४० टक्के पूर्ण झाले. दर्यापूरच्या कामालाही गती द्यावी, असे ते म्हणाले.
अमरावतीत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रस्तावित ६५० निवासस्थानांसाठी २१६ कोटी रुपये मान्य आहेत. त्याची निविदा लवकर काढावी, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कृषी वीज पंपाबाबत ४९२० पंपांना वीजपुरवठा झालेला आहे. उर्वरित कामाबाबत आवश्यक निधीची मागणी पूर्ण होईल. कामे पूर्ण करण्याची तयारी ठेवावी व बैरागड वीज उपकेंद्र ३ महिन्यात पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
आवास योजनांच्या कामांना गती द्यावी
शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना व पं. दीनदयाल उपाध्याय योजनेच्या कामांना गती द्यावी. पं. उपाध्याय योजनेत अधिक प्रस्ताव येणे अपेक्षित होते. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय योजनेचा शोध घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. ते म्हणाले की, आवास योजनेसाठी आवश्यक नोंदणीची कार्यवाही पूर्ण करा. आवश्यक जागेचा तपासही करा. अमरावतीसारख्या मोठ्या जिल्ह्यासाठी आणखी भरीव प्रक्रिया म्हणजे स्वतंत्र मनुष्यबळ किंवा इतर मनुष्यबळावर जबाबदारी देता येइल की कसे, हे तपासावे. आवास योजनेसाठी अपंगांची १०० टक्के नोंदणी करावी. पुरेसा निधी देण्यात येईल. शासकीय जमीनीवरील अतिक्रमण काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बेंबळा पुनर्वसनाच्या कामांबाबत चर्चा
बेंबळा प्रकल्पातील सहा पुनर्वसित गावांसाठी १० रस्ते पूर्ण झाले. ७ रस्त्यांचे काम प्रगतीत आहे. तथापि, या गावांत पाणीपुरवठ्याची कामे अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाहीत. सचिवांनी स्वत: या गावांना भेट देऊन पाहणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. ते म्हणाले की, या गावांतील पुनवर्सनाची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा स्वतंत्र यंत्रणांकडून व्हावीत हे पूर्वीच स्पष्ट केले आहे. जलसंपदा विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी नियमित भरती व आऊटसोर्सिंगही करावे.
आरोग्य विभागाचा आढावा
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी भरती नुकतीच करण्यात आली. वर्ग ३ ची रिक्त पदे लवकर भरावीत. घाटलाडकी व काटपूर येथील येथील प्राथमिक केंद्राचे काम पूर्ण करावे, असे निर्देश देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मेळघाटमधील कामांना प्राधान्य द्यावे. तेथील एकही काम अपूर्ण राहिलेले चालणार नाही. समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी सगळ्या विभागाची ‘डेडिकेटेड टीमङ्क करा, असेही ते म्हणाले.
मेळघाटातील दिया येथील सिपना नदीवरील सौर ऊर्जाधारित उपसा सिंचन योजना व चिखलदरा- धारणीत दुध उत्पादनासाठीचे क्लस्टर याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

Exit mobile version