आमगाव पंचायत समितीवर पुन्हा महिलाराज,बिनविरोध होणार सभापती

0
12

आमगाव,दि.21 ः- पंचायत समितीच्या सभापती पद महिला राखीव असल्याने पंचायत समितीवर पुन्हा महिला राज येणार आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरीता राखीव सभापदीपदाची माळ एकमेव सदस्य असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना बोरकर यांना संधी मिळाली आहे.आमगाव पंचायत समिती सभापती यांच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ जानेवारी २0१८ ला संपत आहे. या पदासाठी नुकतेच पुढील अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी आरक्षण सोडत काढण्यात आले. यात सभापतीपदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे या पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एकमेव सदस्य असलेल्या वंदना बोरकर यांची वर्णी लागणार आहे.
आमगाव पंचायत समितीच्या स्थापनेनंतर १९६२ ते २0१८ च्या सभापतींच्या कार्यकाळातील अठरावे सभापतीपद महिलांना मिळाले आहे. यापूर्वी चार महिलांनी या पदावर कार्यभार सांभाळलेला आहे. पंचायत समिती सदस्यांच्या पक्षीय बलाबल व पूर्ण बहुमत नसल्याने २0१५ ला कॉंग्रेस व भाजपाने युती करून सत्ता काबीज केली होती. पक्षीय सदस्यांमध्ये भाजपाचेतीन, कॉंग्रेसचे चार तर राकॉंचे पाच अशी परिस्थती समोर आहे. यात दोन पक्षांनी सहमतीने सभापदीपद कॉंग्रेसकडे तर उपसभापतीपद भाजपाकडे असे समीकरण पुढे करून सत्ता काबीज केली होती. पंचायत समिती सदस्य संख्या ११ असून यात सहा महिला सदस्या आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन, कॉंग्रेसच्या दोन तर भाजपाकडे एक महिला सदस्य आहे. परंतु, अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर होणार्‍या सभापतीपदासाठी आरक्षणात अनुसूचित जाती महिला सोडत निघाली.
या आरक्षणानुसार एकमेव सदस्य असलेल्या राकॉंच्या कट्टीपार पंचायत समिती सदस्य वंदना बोरकर यांची बिनविरोध निवड निश्‍चित ठरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे बहुमत नसूनही आरक्षणातील सदस्य पक्षाकडे असल्याने सभापतीपद मिळवून पहिल्यांदा सत्ता काबीज करणार आहे. दरम्यान, अडीच उपसभापतीपद कोणत्या पक्षाच्या झोळीत पडणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.