Home विदर्भ बेरोजगार युवक संघटनेचा मोटारसायकल मोर्चा

बेरोजगार युवक संघटनेचा मोटारसायकल मोर्चा

0
मी बेरोजगार, मिळेल केव्हा रोजगार?
गोंदिया,दि.४ : जिल्ह्यात रोजगाराची महत्त्वपूर्ण समस्या भेडसावत असून, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यातही शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांनादेखील नोकरीपासून वंचित ठेवले जात आहे. या गंभीर समस्यांना घेवून एकवटलेल्या बेरोजगार युवकांनी आज (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत देशाचे पंतप्रधान, उद्योगमंत्री, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री यांना देण्यात आले.
गोंदिया जिल्हा रोजगाराच्या दृष्टिकोनातून मागासलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात सुशिक्षितांची फौज तयार होत आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीत सामावून घेण्यात यावे, बिरसी विमानतळ व अदानी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी देण्यात यावी, रेल्वेस्थानकातील ४०० व्हेंडरचे व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात यावे, नगरपरिषद गोंदिया व रोहयोअंतर्गत दुकान गाळे तयार करून सुशिक्षित बेरोजगारांना वाटप करण्यात यावे, जिल्हा सामान्य रुग्णालयाची रखडलेली पदभरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशा आदी मागण्यांना घेवून सुशिक्षित बेरोजगार संघटनाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मेश्राम, उपाध्यक्ष प्रतिक मेश्राम, कमलेश वैद्य, निलेश बावणकर, निशिकांत बन्सोड, शाहरुख पठाण, वैâलाश बन्सोड, सुधीर ढोमणे यांच्या नेतृत्वात मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला.
मोर्चा शहर भ्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दरम्यान, उपरोक्त मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्यामार्फत पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना देण्यात आले. या मोर्च्यात शेकडोच्या संख्येत बेरोजगार युवक सहभागी झाले होते.

Exit mobile version