Home विदर्भ केजरीवालांच्या सिंदखेड राजातील सभेला अखेर परवानगी ;१२ जानेवारीला सभा

केजरीवालांच्या सिंदखेड राजातील सभेला अखेर परवानगी ;१२ जानेवारीला सभा

0

बुलडाणा,दि.09 : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा आपच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. याला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली होती.मात्र या सभेला परवानगी देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे यांनी दिली आहे . याआधी सिंदखेडराजा येथे श्री संत भगवान बाबा महाविद्यालयात १२ जानेवारी रोजी होणार्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकारली होती. सुरक्षा आणि रहदारीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन ही परवानगी नाकारण्यात आल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सांगितले होते. दरम्यान, पोलिस सभेस परवानगी देण्यास टाळाटाळ करीत असून राज्य शासनाचा त्यांच्यावर सभेला परवानगी न देण्यासाठी दबाव वाढला असावा, असा आरोप आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आला होता.
जिजाऊ जन्मोत्सव सोहळ््याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासोबतच आपच्या राज्यातील सर्व पदाधिकार्यांची सभा सिंदखेड राजा येथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल घेणार होते. त्यासाठी जिजाऊ सृष्टीनजीक असलेल्या श्री संत भगवान बाबा महाविद्यालयाची जागा यासाठी आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्यांनी निश्चित करण्यात आली होती. त्यासंदर्भात जागा मालकाची ना हरकत, हेलीपॅडची जागा यासह सर्व बाबींची शहानिशाही पोलिसांसमवेत करण्यात आली होती.डिसेंबर महिन्याच्या मध्यावर यासंदर्भात पोलिसांना अनुषंगीक परवानगीसाठी पत्रही दिले होते. मात्र अचानक दोन जानेवारीला पोलिसांनी सुरक्षा आणि रहदारीच्या कारणावरून केजरीवालांच्या सिंदखेड राजा येथील या सभेस परवानगी
नाकारली. त्यामुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सिंदखेड राजात सभा घेण्याबाबत आपण आग्रही असल्याचे आम आदमी पार्टीचे प्रभारी जिल्हा संयोजक सुनील मोरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.दरम्यान सुरक्षा आणि रहदारीच्या कारणावरून ही परवानगी नाकारण्यात आली आहे.
अन्यत्र ही सभा घेण्याबाबत आक्षेप नसल्याचे बी. एन. नलावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, देऊळगाव राजा यांनी सांगितले होते. अखेर स्थळ बदलुन देउलगावराजा येथे पटोकार नावाच्या शेतकऱयांच्या शेतात सभा स्थळ निश्चित करण्यात आले असून पोलिसांनी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मराठीतून ट्विट करून 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे येणार असल्याचे आज जाहिर केले आहे.

Exit mobile version