Home विदर्भ `जय भीम जय भारत` या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

`जय भीम जय भारत` या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

0

नागपूर,दि.14 : जय भीम जय भारत या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या वतीने रामगिरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार सर्वश्री सुधाकर कोहळे, समीर मेघे, माजी आमदार डॉ.गिरीश गांधी, प्रा.सतिश पावडे तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, इतिहासातील विविध घटना तसेच थोर पुरुषांच्या समाजकार्याबाबतच्या माहितीचे विविध स्वरुपात जतन करणे गरजेचे आहे. यासाठी छायाचित्र हे अतिशय प्रभावी माध्यम ठरु शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजपरिवर्तनाच्या माध्यमातून मानवतेचा व समतेचा संदेश दिला. डॉ.आंबेडकर यांच्या स्मृतींचे जतन व संवर्धन करण्यात येत असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले लंडन येथील निवासस्थान आता आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात आले आहे. इंदू मिल येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक साकारले जाणार आहे. भरीव निधीद्वारे दीक्षाभूमीचाही कायापालट करण्यात येणार आहे.
कॉफी टेबल बुकबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेखर सोनी हे अतिशय कल्पक छायाचित्रकार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विविध स्मारके व स्मृतींवर आधारित असलेले ‘जय भीम जय भारत’ हे कॉफी टेबल बुक अतिशय संग्राह्य असे झाले आहे. विविध सार्वजनिक संस्थांमध्ये हे कॉफी टेबल बुक प्रदर्शित करण्यात यावे ज्यामुळे सर्वांना माहिती मिळू शकेल.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व अतिशय महान असून जय भीम जय भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारके व समग्र जीवनावर आधारित कॉफीटेबल बुक वैशिष्ट्यपूर्ण साकारले आहे.‘जय भीम जय भारत’ या कॉफीटेबल बुकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेल्या विविध वास्तू, त्यांच्या जीवनातील ठळक घटना, विविध वस्तूंची छायाचित्रे यांचा समावेश आहे. आभार मनिष सोनी यांनी मानले.

Exit mobile version