Home विदर्भ बुलढाणा जिल्ह्यातील २२ गावांमध्ये दलित वस्तीत १०० टक्के विद्युतीकरण

बुलढाणा जिल्ह्यातील २२ गावांमध्ये दलित वस्तीत १०० टक्के विद्युतीकरण

0

बुलढाणा,दि.१७:-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महावितरणच्यावतीने सौभाग्य योजनेतून राज्यातील दलितबहुल गावात १००टक्के विद्युतीकरणाच्या कार्यक्रमांतर्गतराज्यभरातील १९२ गावांत हे अभियान राबविण्यात येत असून, यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील २२  गावांचा समावेश असून तेथे वीज जोडणी देण्याची प्रकिया सुरु झाली आहे.

राज्यातील ज्या गावात ८० टक्यापेक्षा अधिक दलितवस्ती आहे व गरीब कुटुंबांची संख्या अधिक आहे अशा गावात १०० टक्के विद्युतीकरण करण्यात येणार असून यातबुलढाणा जिल्ह्यातील २२  गावांमध्ये जवळपास ५०० नवीन विद्युत जोडण्या देण्यात येणार आहेत. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबीर लावण्यात येणार असून या शिबिरात लाभार्थ्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे. ज्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आलेला आहे अशा ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरली तरच त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सदर गावांमध्येही या अभियानाअंतर्गत सौभाग्य योजनेतील तरतुदींप्रमाणे १०० टक्के वीज जोडणी दिल्या जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री हर घर बिजली योजना,अर्थात सौभाग्य योजनेत प्रत्येक कुटुंबापर्यंत वीज पोहोचवण्याचे उदिष्ट्य असून ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक घरात वीज जोडणी देण्यात येत आहे. दि. १४ एप्रिल ते ३०एप्रिल या दरम्यान संपूर्ण राज्यात ‘ग्रामस्वराज्य’ अभियान राबविण्यात येणार आहे.

Exit mobile version