Home विदर्भ नगरसेवकांनी काढली सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा

नगरसेवकांनी काढली सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा

0

बुलढाणा,दि.17ःः- जिल्ह्यातील शेगाव  नगर पालिकेच्या हद्दीअंतर्गत विकास आराखड्यामधुन रस्त्याची कामे करण्यात आली. या रस्त्यालगत शहरभर हजारो झाडांची लागवड न.प.च्या वतीने करण्यात आली. मात्र ही झाडे पाण्याअभावी सुकत असल्याने याबाबत प्रशासनाची झोप उघडविण्यासाठी आज गुरुवारी दुपारी शिवसेनेच्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा काढत नगर पालिकेसमोर आंदोलन केले.
शेगाव विकास आराखड्याअंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी शहरातील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र शहर विकास करीत असतांना या झाडांच्या मोबादल्यात हजारो झाडे शहराच्या हद्दीत लावण्यात आली. अनेक भागांमध्ये नगर पालिका व शहरातील दानशुर संस्थांच्या वतीने ट्री- गार्ड ही लावण्यात आले. मात्र भर उन्हाळयामध्ये या झाडांना पाणी नसल्याने शहरातील शेकडो झाडे पुर्णपणे सुकली आहेत. तर हजाराच्या वर झाडे सुकण्याच्या मार्गावर आहे. या झाडांना नगर पालिकेने टँकर व्दारे पाणी पुरवठा करावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. यावर मुख्याधिकायांनी टँकरव्दारे लगेच पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र आश्वासनाची पुर्ती झाली नसल्याने आणि झाडे मृत पावण्याच्या संख्येत वाढ होत चालल्याने आज गुरुवारी शिवसेनेच्या नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष दिनेश शिंदे, शैलैष डाबेराव, योगेश पल्हाडे, काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक शैलेष पटोकार  यांच्यासह राजाभाऊ शेगोकार, गोपाल पांडे, आशिष गणगणे आदींनी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान शिवाजी चौक येथुन सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा काढुन न.प.मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या थेट कॅबिन समोर धडकवली. यावेळी पोलीसांनी अडविल्याने ही तिरडी यात्रा कॅबिनच्या आत पोहचविता आली नाही. दरम्यान आंदोलकांनी न.प.च्या इमारतीमध्ये तिरडी ठेवून ठाण मांडले.

Exit mobile version