Home विदर्भ गावाच्या विकासाला ग्रामस्वराज अभियानाची जोड द्या:- पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम

गावाच्या विकासाला ग्रामस्वराज अभियानाची जोड द्या:- पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम

0

अहेरी,दि.09(अशोक दुर्गम):-ग्रामीण भागातील समस्त् जनतेला त्यांच्या मुलभुत सोईसवलती त्यांच्या घरापर्यंत प्राप्त् व्हाव्यात, या उदात्त् हेतुने केंद्र शासनाने प्रधानमंत्री ग्राम स्वराज अभियान सुरु केले असून यात प्रधानमंत्री सौभाग्य् योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना व इतर योजनांची सांगड घालुन सर्वकष ग्राम स्वराज अभियान राबविण्याचा मानस सर्व सरपंच व ग्रामसेवकांनी ठेवावा असे प्रतिपादन राज्यमंत्री, आदीवासी विकास व वने तथा पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी आयोजित ग्रामस्वराज अभियान कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने अहेरी,मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा व भामरागड या तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी, सरपंच व ग्रामसवेकांची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आलापल्ली येथिल वनंसपदा सभागृहात करण्यात आले. कार्यशाळेच्या अध्यक्षपदी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग तर मुख्य् कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड, अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणचे प्रकल्प् संचालक पठारे व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य् कार्यकारी अधिकारी पुराम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेला संबांधित करताना पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी, गावातील विकास करताना सरपंचानी आपले राजकिय हेवेदावे विसरून सर्वकष योजनाचा लाभ आपल्या ग्रामपंचायती अंतर्गत गावातील ग्रामस्थांना मिळवून द्यावा. कोणतीही योजना किंवा अभियान यशस्वी करताना सरपंचाची भुमिका फार महत्वाची असून त्यांच्याच पुढाकारांने हे ग्रामस्वराज अभियान यशस्वी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त् केली.
कार्यशाळे दरम्यान गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी हे अभियान राबविताना येत असलेल्या अडचणी बाबत सरपंचाशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नाला त्यांनी समर्पक उत्तरे दिली. चर्चात्मक् मार्गाने सर्व समस्यांवर मात करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी सहकाय करावे त्यांना विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी बोलून दाखविला.कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रकल्प् संचालक पठारे यांनी केले तर आभार प्रदर्शन एटापल्लीचे गट विकास अधिकारी वाघमारे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीकरीता अहेरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश डोके यांचेसह सर्व कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यशाळेला पाचही तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version