Home विदर्भ कालबध्द नियोजनातून अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करा-मुख्यमंत्री फडणवीस

कालबध्द नियोजनातून अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करा-मुख्यमंत्री फडणवीस

0

 गोंदिया जिल्हा आढावा बैठक
गोंदिया, दि.११ : जिल्ह्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासोबतच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्ह्यातील अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प कालबध्द नियोजनातून वेळीच पूर्ण करा. असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
आज विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात आयोजित गोंदिया जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले खा. मधुकर कुकडे, खा. अशोक नेते, आमदार सर्वश्री डॉ. परिणय फुके, गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, मुख सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील ज्या उपसा सिंचन योजना अपूर्ण आहेत, त्या सुध्दा वेळेच्या आत पूर्ण होतील असे नियोजन करण्यात यावे असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पिंडकेपार लघु सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ४० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. वेबारटोला, ओवारा, निमगांव, पांढरवाणी, भूराटोळा या अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा देखील आढावा घेतला. जिल्ह्यातील कोणताही शेतकरी पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची बँकांनी तसेच प्रशासनाने दक्षता घ्यावी. ग्रामीण व राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष लक्ष देवून कर्ज उपलब्ध करुन द्यावे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असेल आणि त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्यास त्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, असे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना व शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा. त्यामुळे त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना शुध्द व स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतुन तयार होणाऱ्या पाणी पुरवठा योजना ह्या सौर उर्जेवर आणण्याचे नियोजन करावे. त्यामुळे ह्या पाणीपुरवठा योजना वीज बील न भरल्यामुळे बंद राहणार नाही. जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे पोलीसांना पोलीस स्टेशनच्या परिसरात पोलीस गृहनिर्माण योजनेच्या माध्यमातून घर बांधून देण्याची तसेच गोंदिया शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले.
गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयातील व बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश देवून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की, ही पदे भरतांना जिल्ह्यातील व्यक्तिंना प्राधान्य द्यावे. तसेच जिल्हा परिषदेतील रिक्त पदे सुध्दा त्वरीत भरण्याच्या दृष्टीने पाउले उचलावी. वनहक्क जमिनीच्या पट्टयांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना रितसर पट्टे देण्याची कार्यवाही करावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वर्ग २ मध्ये असलेल्या जमिनी वर्ग १ मध्ये करतांना शेतकऱ्यांकडून अर्ज न मागविता जिल्हा प्रशासनाने स्वत:हून करुन द्यावे, असे सांगितले. यावेळी पालकमंत्री बडोले, खा. कुकडे व खा. नेते तसेच आमदार सर्वश्री अग्रवाल, रहांगडाले, पुराम, डॉ. फुके यांनी जिल्ह्यातील विविध समस्या मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या. आढावा बैठकीचे सादरीकरण डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले.

Exit mobile version