Home विदर्भ कामठाच्या विकासासाठी अधिक निधी मिळवून देणार

कामठाच्या विकासासाठी अधिक निधी मिळवून देणार

0

गोंदिया,दि.22: मंदिर व सर्व धर्मस्थळ ऊर्जा व शांतीचे केंद्र आहेत. त्यामुळे सर्व समाजालाच ऊर्जा, आध्यात्मिक शांती व सद्बुद्धी मिळते. या धर्मस्थळांच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार. धर्मनगरी कामठ्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी मिळवून देणार, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
कामठा येथील राधाकृष्ण मंदिरात पाच लाख रूपये खर्चाच्या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आ. अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
आ. अग्रवाल पुढे म्हणाले, कामठा व लहरी आश्रमात आल्यावर मनाला शांती प्राप्त होते. ही धर्मनगरी गोंदिया विधानसभा क्षेत्रात आहे, हे आमचे सौभाग्य आहे. या परिसराच्या विकासासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. आता रावणवाडी-आमगाव मार्ग ते कामठ्याच्या मधातून मुंडीपारसाठी रस्ता बांधकाम केले जात आहे. कामठा ते नवरगावकला रस्ता व पूल, पांगोली नदीवर बंधारा, पाणी पुरवठा योजना, विद्युत उपकेंद्र व क्रीडा तसेच व्यायामाला प्रोत्साहन देण्यासाठी तालुका क्रीडा संकुलाचे बांधकाम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून जि.प. अध्यक्ष सीमा मडावी यांनी, जिल्हा परिषदेने लहरी आश्रम परिसरात सभामंडप बांधकामाचा निर्णय घेतला आहे. याचे आदेश लवकरच जाहीर होतील, असे सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. आरोग्य सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, जि.प. सदस्य विजय लोणारे, संतोष घरसेले, कृउबासचे संचालक सावलराम महारवाडे, मनोज दहिकर, सरपंच लिलेश्वर कुंभरे, उपसरपंच प्रकाश शेवतकर, टिकाराम भाजीपाले, गोपालबाबा खरकाटे, माजी सरपंच कल्पना खरकाटे, दिनेश अग्रवाल, संजय अग्रवाल, सुरेंद्र खरकाटे, गुड्डू भाजीपाले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version