Home विदर्भ नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- पालकमंत्री बडोले

नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- पालकमंत्री बडोले

0

गोंदिया, दि ५ : अवकाळी पावसामुळे जिल्हयातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नोंद कृषी विभागाने योग्य पध्दतीने घ्यावी. नुकसान कमी असो वा जास्त असो, फळपिकांचे असो अथवा भाजीपाला पिकाचे असो झालेल्या नुकसानाची नोंद होणे महत्वाचे असून एकही शेतकरी नुकसानाच्या मदतीपासून वंचित राहता कामा नये. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवाना समस्येतून बाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न प्रशासनाद्वारे करण्यात येईल असे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. २८ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये (ता.५) ते बोलत होते.
बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी , जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) एन.के.लोणकर, सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी उपस्थित होते.
बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी सडक अर्जुनी येथे अंदाजे १०० हेक्टरवरील झालेल्या नुकसानीबाबत माहिती घेतली. तिरोडा व अर्जुनी मोरगावला पावसाचे जास्त प्रमाण असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची नोंद कृषी अधिकारी, तहसिलदार यांनी प्रामुख्याने घ्यावी असे सांगितले. या कालावधीत जिल्हयात सरासरी १०० मिमी पाऊस पडला असून सर्व तालुक्यातील जवस, गहू, लाखोरी, ऊस, ज्वारी या पिकांचे लागवडीखालील क्षेत्र व त्याप्रमाणातील झालेल्या नुकसानाचे प्रमाण याबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आपली सादरीकरणाद्वारे जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील पीक लागवडीखालील क्षेत्र, पावसाचे प्रमाण, जीवित व वित्तहानी याबाबत माहिती दिली. सालेकसा तालुक्यातील पाहणी व नुकसानग्रस्त भागाची नोंद त्वरीत पुर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
येणाऱ्या उन्हाळ्यात जिल्हयात पाणीटंचाई होऊ नये या उद्देशाने ४४ गांवाकरीता तयार करण्यात आलेला पाणीटंचाई आरखडयाची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाद्वारे तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये पाणी अडवण्याबाबतच्या धोरणाबाबत त्यांनी चर्चा केली. ११ गावांमध्ये प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेबाबत त्यांनी माहिती घेतली.
जिल्हयात स्वाईन फ्लू आजाराबाबत आरोग्य विभागाने केलेल्या जनजागृतीबाबत पालकमंत्र्यांनी माहिती घेतली. तसेच अपंगाना अपंगत्वाचे प्रमाणपत्र वितरीत करण्याकरीता शिबीर घेण्यात यावे असे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. रवि धकाते यांना सुचविले. यावेळी तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version