Home विदर्भ कृषि महोत्सवामुळे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत-हर्षदा देशमुख

कृषि महोत्सवामुळे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत-हर्षदा देशमुख

0
????????????????????????????????????
  • वाशिम जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन
  • प्रदर्शनामध्ये विविध १६० स्टॉलचा समावेश

वाशिम, दि. २१ : शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देवून या तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास जिल्हा कृषि महोत्सवामुळे मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. आज जिल्हा क्रीडा संकुल येथे आत्मामार्फत आयोजित पाच दिवसीय जिल्हा कृषि महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, प्रगतशील शेतकरी श्री. गरदडे, राज्य शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारप्राप्त दिलीप फुके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्ज्वलन तसेच महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील दालनाची फीत कापून मान्यवरांच्या हस्ते जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनातील दालनांना भेट दिली. २५ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार आहे.

श्रीमती देशमुख म्हणाल्या, शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केलेले शेतकरी, शेतकरी गटांचे त्याचबरोबर शेतीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अवजारे, औषधे उत्पादित करणाऱ्या कंपन्यांचे स्टॉल जिल्हा कृषि महोत्सवातील प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत. तसेच महोत्सव काळात कृषि क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रगतशील शेतकरी यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतीमधील नाविन्यपूर्ण संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयीची माहिती शेतकऱ्यांना मिळणार असून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, आत्मा मार्फत आयोजित जिल्हा कृषि महोत्सवाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट देवून आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, हे तंत्रज्ञान समजून घेवून आपल्या शेतीमध्ये वापरावे. वाशिम जिल्ह्याची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास होण्यासाठी शेती व शेतीवर आधारित व्यवसायांचा विकास होणे आवश्यक आहे. आगामी काळात कृषि विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. कृषि विषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील राहणार असल्याचे श्री. मोडक यांनी सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री. गरदडे, श्री. फुके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. गावसाने यांनी प्रास्ताविकातून जिल्हा कृषि महोत्सव आयोजनाचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंचालक श्री. कदम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार कारंजाचे तालुका कृषि अधिकारी संतोष वाळके यांनी मानले.

प्रदर्शनीमध्ये १६० स्टॉल्सचा समावेश

जिल्हा कृषि महोत्सवामध्ये उभारण्यात आलेल्या प्रदर्शनीत विविध शासकीय कार्यालये, महिला बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासह शेतीशी निगडीत विविध अवजारे, उपकरणे, रासायनिक व सेंद्रिय औषधे, खते व बियाणे उत्पादित करणाऱ्या कंपन्यांच्या सुमारे १६० स्टॉल्सचा समावेश आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेले खाद्य पदार्थ, सेंद्रिय शेतीतील उत्पादने यांची विक्री याठिकाणी होत आहे.

Exit mobile version