Home विदर्भ सडक अर्जुनी तालुक्यात रेतीचा अवैध उपसा

सडक अर्जुनी तालुक्यात रेतीचा अवैध उपसा

0

सडक-अर्जुनी,दि.13ः तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, मालीजुंगा, घटेगाव, रेगेंपार, बकीटोला या वन व महसूल विभागाच्या रेती घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याची माहिती व तक्रार सुद्धा गावकऱ्यांनी या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. मात्र त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे रेती माफियांची हिम्मत वाढत असल्याचे चित्र आहे.सितेपार वनविभागाच्या नाल्यातून दररोज सकाळी व संध्याकाळी रेतीचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याची माहिती सुध्दा काही गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्र व तहसील कार्यालयाला दिली. मात्र अद्यापही कुठलीच कारवाई केली नाही. उलट डव्वा येथील मंडळ अधिकारी पांढरी येथील तलाठी यांना याची माहिती देण्याचा सल्ला दिला. यामुळे या विभागाचे अधिकारी व कर्मचारी रेती माफीयांना अभय देत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
या परिसरातील रेती घाटावरुन दररोज ३० ते ३५ ट्रॅक्टर रेतीचा अवैध उपसा केला जात असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल सुध्दा बुडत आहे.रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे या परिसरातील रस्त्यांची सुध्दा दुदर्शा झाली आहे. त्यामुळे याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रेतीची अवैध तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रेतीच्या अवैध तस्करीकडे दुर्लक्ष करणाºया महसूल व वन विभागाच्या अधिकाºयांची चौकशी करुन कारवाही करण्याची मागणी केली जात आहे.

Exit mobile version