Home विदर्भ न्यायालयाच्या निर्णयानंतरही ठवरेंच्या घरावरील ताबा दुबे सोडेनात

न्यायालयाच्या निर्णयानंतरही ठवरेंच्या घरावरील ताबा दुबे सोडेनात

0

१५ मार्चपासुन अन्यायग्रस्त बसणार आमरण उपोषणाला

गडचिरोली-दि १४ :-न्यायालयीन निर्णयानुसार एक वर्ष लोटुनही गरीब व अनुसुचित जातीचे घर सोडले नसल्याने प्रभातकुमार दुबे यांच्या विरुद्ध अनुसुचित जाती जमाती अत्याचार कायद्यांतर्गत कारवाई करुन घर खाली करण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांच्याकडे पाठविण्यात आले.त्या पत्रावर कारवाई न केल्यास १५ मार्च पासुन आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देसाईगंज येथील नामदेव ठवरे यानी दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगर परिषद हद्दीतील मातावार्डातील अत्यंत गरीब व अनुसुचित जाती समाजाचे नामदेव काशिनाथ ठवरे यांच्या मालकीच्या घरी किरायाने घेतलेल्या घरात किराया न देताच बेकायदेशीर अतिक्रमण करून देसाईगंज येथील एका स्थानिक वृत्तपत्राचे संपादक प्रभातकुमार दुबे यानी न्यायालयाच्या निकालापासुन एक महिन्याच्या आत घर रिकामे करून थकलेल्या किराया पोटी वादीला सहा हजार रुपये तसेच निकालापासुन सदर घरात बेकायदेशिर अतिक्रमण करून रहात असल्याने दररोज पन्नास रुपये देण्याचे आदेश गडचिरोली जिल्हा मुख्य सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस.जी.मेहरे यांनी १७ नोव्हेंबर २०१७ ला दिले होते.
या आदेशाला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटलेला असतांना देखिल प्रभातकुमार दुबे यांनी न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही किरायाचे घर अद्याप खाली न करता अत्यंत हलाखीची परिस्थिती जगणा-या अनुसुचित जाती समाजाचे नामदेव ठवरे यांचा घर न सोडण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.देसाईगंज येथील मातावार्डातील घर क्रमांक १७ हा नामदेव काशिनाथ ठवरे यांच्या मालकीचा आहे.आपल्या कष्टाने बांधलेल्या घराचा किराया म्हातारपणी कामी येईल या आशेने आपल्या मालकीचा घर प्रभातकुमार दुबे यांना सन २००८ मध्ये ७५०/-रुपये मासिक भाडे तत्वावर दिले होते.मात्र किरायेदार प्रभातकुमार दुबे याने मार्च २०११ ते सप्टेंबर २०११ या कालावधीत एकुण ५२५० रुपये किराया न देताच बेकायदेशिर अतिक्रमण करून रहात असल्याबाबत रितसर नोटीस देऊन थकलेला किराया व मालकीचा घर खाली करण्यासाठी नोटीस बजावली होती.
परंतु सदर घराची जागा नझूलची असुन किराया व घर खाली करण्याचा प्रश्नच नाही असे कळविल्याने हे प्रकरण अखेर देसाईगंज येथिल दिवाणी न्यायालयात गेले.देसाईगंज दिवाणी मामला क्रमांक ०१/२०१२ चा निकाल ३०.४.२०१६ ला विरोधात लागल्याने या निर्णयाविरूद्ध नामदेव ठवरे याने गडचिरोली जिल्हा मुख्य सत्र न्यायालयात नियमित दिवाणी अपील मामला क्रमांक ३७/२०१६ अन्वये अपील दाखल केल्या नंतर दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ ला गड़चिरोली जिल्हा मुख्य सत्र न्यायाधिश एस.जी.मेहरे यांनी दिलेल्या निकालात उपरोक्त आदेशाला पुर्णत: बाजुला सारून ठवरे यांच्या बाजुने निकाल दिले.
या निकालात प्रतिवादी प्रभातकुमार दुबे याने एक महिन्याच्या आत रिकामे करून शांततेत परिसराचा ताबा सोडण्याचे आदेश दिले आहेत.तसेच किरायाची थकलेली एकुण ६ हजार रुपये देऊन न्यायालयाच्या निकालापासुन घरात बेकायदेशिर अतिक्रमण करून रहात असल्याने निकालापासुन दररोज पन्नास रुपये देण्याचे आदेशात नमुद केलेेेला आहे.तरी या आदेशाला न जुमानता अत्यंत गरिब व अनुसुचित जाती समाजाचा असल्याने स्वमिळकतीतुन बांधकाम केलेल्या घरात बेकायदेशीर घुसून अतिक्रमण केले आहे.त्यामुळे प्रभातकुमार दुबेवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार कायद्यांतर्गत कारवाई न केल्यास १५ मार्च २०१९ पासुन आपल्या घरासमोरच आमरण उपोषणाला सुरुवात करणार असुन जिवाचे कमी जास्त झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी गडचिरोली,पोलीस अधिक्षक गडचिरोली, यांची राहील असे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री,महसुल मंत्री,प्रधान सचिव महसुल व वने मुंबई,विभागीय आयुक्त नागपूर,पोलीस महासंचालक मुंबई,जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली,पोलीस अधिक्षक कार्यालय गडचिरोली,उपविभागीय अधिकारी देसाईगंज,उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा, तहसिलदार तहसिल कार्यालय देसाईगंज,पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन देसाईगंज यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version