Home विदर्भ आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करा — जिल्हाधिकारी

आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करा — जिल्हाधिकारी

0

 मान्सुन पूर्वतयारी आढावा बैठक
 जिल्हयात नदीकाठावर 154 गावे
 पुरामुळे संपर्क तुटणारी 18 गावे
भंडारा, दि. 9:- नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या मृत्युपेक्षा अयोग्य नियोजनामुळे मरणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता पासून सर्व विभागाने योग्य नियोजन केल्यास पूर, अतिवृष्टी व आगीमुळे होणारी आपत्ती टाळता येईल. जिल्हयातील नदीकाठावरील गावांत पाणी शिरुन मनुष्यहानी, पशुहानी तसेच वित्तहानी, शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अचानक उदभवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क रहावे. सोबतच प्रत्येक विभागाने आपला आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करुन 15 दिवसात सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी दिल्या.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सुन पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते.
भंडारा जिल्हयातून वाहणारी वैनगंगा ही प्रमुख नदी असून कन्हान नदी, सुरु नदी, बावनथडी व चुलबंद या उपनदया आहेत. नदी काठावरील गावांची संख्या 154 असून नदी, नाले व धरणामुळे 130 गावे नुकसान ग्रस्त होतात. शिरपूर, पुजारीटोला, कालीसराड, इटियाडोह प्रकल्प व मध्यप्रदेशातील संजय सरोवरामुळे जिल्हयात पुर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पुरामुळे एकूण 18 गावांचा दुसऱ्या गावांशी संपर्क तुटतो तर जिल्हयातील 31 रस्ते पुरामुळे क्षतीग्रस् होऊ शकतात. भंडारा जिल्हयात 14 ते 17 सप्टेंबर 2005 दरम्यान पुराची स्थती उदभवली होती. त्यानंतर 22 ते 23 जुलै2014 रोजी अतिवृष्टी झाली होती.
आपपल्या विभागाचे आराखडे तात्काळ तयार करुन यादीसह आपत्ती व्यवस्थापन शाखेस सादर करावे. या कामास प्राधान्य दयावे, हयगय करु नये. सर्व गावात मान्सून पूर्व जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असून मुलभूत बचाव कार्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण लवकर आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. आपत्ती काळात सर्व विभागाने समन्वय ठेवावा तसेच यासाठी प्रत्येक विभागाने नोडल अधिकारी नेमावा. आपत्ती कक्षातून येणाऱ्या सूचनांना तात्काळ प्रतिसाद दयावा, असे ते म्हणाले.
पाळ फुटण्याची शक्यता असलेल्या मामा व लपा तलावाची तात्काळ दुरुस्ती करुन घ्यावी. पर्जन्यमापक यंत्राची तपासणी करावी. प्रकल्प, पुल, रस्ते, शाळा व इमारती तसेच विद्युत यंत्रणांची तपासणी करुन योग्य असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आरोग्य विभागाने मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवावा. पुरामुळे वाळीत होणाऱ्या व संपर्क तुटणाऱ्या गावात तीन महिन्याचा धान्य साठा पुरविण्यात यावा,अशा सूचना त्यांनी दिल्या.
पुरग्रस्त गावांतील आपत्ती व्यवस्थापन सर्व विभागांनी करावे. जिल्हयातील सर्व सामाजिक संस्थांचे दुरध्वनी क्रमांक मिळवून अद्यावत करा, असे ते म्हणाले. पाटबंधारे विभागाने धरणाच्या पाण्याच्या पातळीची माहिती अद्यावत ठेवावी. तसेच धरणाची दुरुस्ती करावी. आरोग्य विभागाने साथीचे रोग व इतर आपत्तीविषयक काळजी घ्यावी. विद्युत विभागाने जबाबदारीने आपले काम करावे कारण आपत्तीच्या वेळी विजेच्या धक्कयाने मरणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. मानवी अतिक्रमाणामुळे निसर्गाचा ऱ्हास होतो. त्यामुळेच आपत्ती मोठया प्रमाणात घडते, असे ते म्हणाले. पुरग्रस्त भागातील नियोजनासाठी शाळा व इतर स्थळे तयार ठेवावी. अग्नीशमन यंत्रणा या काळात सज्ज ठेवा, नगर परिषदेने याकडे दयावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
आरोग्य विभागातर्फे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून हा कक्ष 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. या बैठकीत पोलीस , वन, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, कृषि, मत्सय् व्यवसाय, नगरपरिषद, वीज वितरण कंपनी, उपप्रादेशिक परिवहन, राज्य मार्ग परिवहन, दूरसंचार, भूमी अभिलेख, पाटबंधारे, अन्न पुरवठा तसेच इतरही विभागाचा आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी सादरीकरण केले.

Exit mobile version