Home विदर्भ वाशिम जिल्ह्यातील सरपंचांचा ‘ऑडिओ ब्रीज’द्वारे मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद

वाशिम जिल्ह्यातील सरपंचांचा ‘ऑडिओ ब्रीज’द्वारे मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद

0

ग्रामस्थांच्या मागणीनुसार टँकर्स आणि रोहयो,कामांचे नियोजन करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वाशिम, दि. १४ : ग्रामस्थांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर्स व रोहयो कामांचे नियोजन करुन प्रशासनाने नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सूचना ‍मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.वाशिम जिल्ह्यातील सरपंच, गटविकास अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ऑडिओ ब्रीजद्वारे थेट संवाद साधत दुष्काळी उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील सरपंचांनी गावातील टँकर, पाण्याच्या टाक्या, विंधन विहिरी, प्रलंबित पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, रोहयोची कामे अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती दिली. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

रिसोड तालुक्यातील सरपंचांनी मागणी केल्याप्रमाणे राष्ट्रीय पेयजल व मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत पाण्याची व्यवस्था करावी. तसेच जेथे गरज असेल तिथे रोजगार हमीची कामे मिळतील याकडे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २०१८ मधील लोकसंख्या विचारात घेऊन त्याप्रमाणे टँकरचा पाणी पुरवठा वाढविण्यात यावा. टंचाई संदर्भात तातडीच्या बाबींवर ४८ तासांच्या आत निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी. तसेच आजच्या संवादात सरपंचांनी मांडलेल्या मुद्द्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.

वाशीम जिल्ह्यासाठी उपाययोजना

वाशिम जिल्ह्यातील रिसोड या तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्यामध्ये १०० गावे आहेत. या तालुक्यात एकूण ३ टँकर्स सुरू आहेत. जिल्ह्यात ६ तालुक्यामध्ये एकूण १६ टँकर्स सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात आज अखेर १४५ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची दक्षता घेण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची १३.६७ लाख रू. इतकी थकीत विद्युत देयकांची रक्कम महावितरण कंपनीस भरण्यात आली आहे. रिसोड या तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला असून एकूण १०० गावातील ५३ हजार ११५ शेतकऱ्यांना ४४ कोटी रुपये इतकी मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यात ५६२ कामे सुरू असून त्यावर ३ हजार ६५८ मजूर उपस्थिती आहे. जिल्ह्यामध्ये ४ हजार १४२ कामे शेल्फवर आहेत. जिल्ह्यातील एकूण १ लाख ३४ हजार ८५९ शेतकऱ्यांनी खरीप २०१८ करिता पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. आज अखेर १.०२ कोटी रुपये इतकी रक्कम ३ हजार ७८८ शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील १.०२ लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी ४२ हजार १७६ शेतकऱ्यांना एकूण ८.४४ कोटी रूपये इतके अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे.बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंधारण आणि रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेश सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version