Home विदर्भ कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मितीमुळे देशाची प्रगती-मुख्यमंत्री

कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मितीमुळे देशाची प्रगती-मुख्यमंत्री

0

अमरावती : भारत आज जगामध्ये सर्वात तरूण असलेला देश आहे. जगाचे सरासरी आयुर्मान वृद्धत्वाकडे झुकत असताना आपल्या देशात मात्र ते तरूण होत आहेत. या तरुण पिढीची कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यामुळे देशाची प्रगती वेगाने होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कै. अरविंद ऊर्फ भाऊ अनंत लिमये सभागृहात ‘तंत्रज्ञानाचा कौशल्य विकासावर होणारा परिणाम’ या विषयावर दोन दिवसीय 46 व्या मिड टर्म परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, माजी मंत्री जगदीश गुप्ता, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, दि. इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सच्या अध्यक्षा डॉ. स्मृती डागर, टीपीपीसीचे अध्यक्ष डॉ. एम.एच. कोरी, डॉ. जे. डब्ल्यू. बाकल, पी. के. जागिया, प्रा. अजय ठाकरे, डॉ. एस. ए. लढके, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जगामध्ये आपल्या देशात तरूणांची असलेली सर्वात जास्त संख्या ही एक संधी असून या संधीचे रूपांतर देशापुढील आव्हाने यशस्वीपणे पेलण्यासाठी करावे. समाजातील बहुतांश टक्का आज कार्यरत असणाऱ्या वयोगटात मोडतो. या गटाचे कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्मितीमध्ये रूपांतर केल्यास आपला देश विकसित होण्यास विलंब लागणार नाही. या कौशल्य विकासासाठी उच्च शिक्षणाची आवश्यकता आहे. तरूण लोकसंख्येला पुरेल एवढ्या उच्च शिक्षणाची व्यवस्था आपणाकडे असली पाहिजे, तरच कौशल्य विकासावर आधारित मनुष्यबळ निर्माण होऊ शकेल. ही लोकसंख्या रोजगारक्षम असणार आहे.देशात खूप मोठ्या प्रमाणावर संशोधनाच्या संधी उपलब्ध आहे. हे संशोधन समाजाच्या व तळागाळातील घटकांच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.डॉ. डागर यांनी आय.ई.टी.ई. या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेतला. डॉ. कोरी, डॉ. लढके यांनीही विचार मांडले.

Exit mobile version