कायदेविषयक महाशिबिराचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करा- न्या.सुहास माने

0
19

गोंदिया,दि.10 : जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कायदेविषयक जनजागृती व विविध शासकीय योजनांची माहिती व्हावी यासाठी 16 फेब्रुवारी रोजी नवेगावबांध येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कायदेविषयक महाशिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना कसा मिळेल याचे नियोजन करा. असे निर्देश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांनी दिले.

8 जानेवारी रोजी नवेगावबांध येथे प्रकाष्ट निष्कासन अधिकारी कार्यालयातील सभागृहात पुर्वतयारी आढावा सभेत न्या.माने बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव मोरेश्वर दुधे, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.शासन आपले दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 16 फेब्रुवारी 2020 रोजी नवेगावबांध येथे शासकीय गोदामाच्या प्रांगणात भव्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

न्या.माने पुढे म्हणाले, कायदेविषयक जनजागृती व शासकीय सेवा व विविध योजनांचा या महाशिबिराच्या माध्यमातून 25 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्‍ट निश्चित करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक लोककल्याणकारी व विकासाच्या योजना आहेत या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत या महाशिबिराच्या माध्यमातून पोहोचवून त्यांना न्याय देण्याचे काम जास्तीत जास्त प्रमाणात झाले पाहिजे असे ते म्हणाले.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, पुरवठा विभागातील शिधापत्रिका संबंधीत कामे, कृषि विभागातील खते व बियाणे परवाने, परिवहन विभागातील अनुज्ञप्ती, घरकुल योजना, विमा योजना, दिव्यांगासाठीच्या योजना यासह विविध विभागाच्या योजनांचा लाभ तसेच त्या विभागाच्या सेवा संबंधीत पात्र लाभार्थ्यांना पोहोचविण्याचे नियोजन या महाशिबिराच्या माध्यमातून करावे असेही न्या.माने यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांनी सर्व विभाग प्रमुखांना शासकीय योजनेची माहिती तसेच योजनेसाठी लागणारे महत्वाचे दस्ताऐवज संदर्भात लाभार्थ्यांना माहिती देवून संबंधीत कार्यालयात जमा करुन प्रत्येक गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. तसेच विविध योजना व सेवांचा लाभ गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन देखील केले. या आढावा सभेला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे यांनी केले. उपस्थितांचे आभार तहसिलदार विनोद मेश्राम यांनी मानले.