इंटरसिटी, शिवनाथ एक्स्प्रेस मुख्य स्थानकावरून सुरू व्हावी-माजी खा.पटले

0
240

गोंदिया,दि.04 : नागपूर शहरातील प्रत्येक भागातील प्रवाशांना गाडी पकडणे सोयीचे व्हावे म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा इतवारी येथून आणि हावडाकडे जाणाऱ्या गाडय़ा नागपूर किंवा अजनी येथून सुरू करण्याची सोबतच भंडारा-गोंदियातील प्रवाशांनाही इतवारी स्थानकावरुन रेल्वेगाडी पकडतांना गैरसोय होत असल्याने त्या अजनी किंवा नागपूरवरुन सुरुकरण्याची मागणी भंडारा-गोंदियाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी रेल्वे महाव्यवस्थापकांना पत्र लिहून केली आहे. मात्र, हे दोन स्थानक रेल्वेच्या दोन वेगवेगळ्या विभागाकडे असल्याने त्यावर निर्णय घेण्याचे टाळले जात आहे. इतवारी, अजनी स्थानकांवरील गाडय़ांची अदलाबदल होणे गरजेचे आहे.उत्तर, पूर्व नागपुरातील लोकांना मुंबई, पुण्याला जाणारी गाडी पकडण्यासाठी नागपूर स्थानक किंवा अजनीला यावे लागते.  पश्चिम, दक्षिण, दक्षिण-पश्चिम नागपुरातील लोकांना रायपूर, बिलासपूरला जाणाऱ्या गाडय़ा पकडण्यासाठी इतवारी स्थानकावर जावे लागते. हे अंतर जास्त आहे. तसेच रस्त्यावरील वाहतुकीमुळे बराच वेळ जातो.

इतवारी- बिलासपूर- इतवारी इंटरसिटी एक्सप्रेस आणि इतवारी- बिलासपूर-इतवारी शिवनाथ एक्सप्रेस इतवारी स्थानकाहून निघते आणि येथेच थांबते. नागपूर शहर चारही दिशांना विकसित होत आहे. इतवारी रेल्वे स्थानक शहराच्या उत्तर-पूर्व दिशेला एका कोपऱ्यात आहे. त्यामुळे शहरारातील पश्चिम, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम भागात राहणाऱ्या प्रवाशांना या दोन्ही गाडय़ांपर्यंत पोहचण्यासाठी फार त्रास होत आहे. गाडीच्या वेळेपर्यंत पोहचण्यात अनेकदा विलंब होत असल्यानै गैरसोय होत असते. नागपूर आणि अजनी स्थानक  शहराच्या मध्यभागी आहे. तेव्हा या दोन्ही गाडय़ा नागपूर किंवा अजनी स्थानकाहून सोडण्यात याव्यात. जेणेकरून  प्रवाशांना सोयीचे होईल, असे माजी खासदार पटले  यांनी महाव्यवस्थापकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.