गडचिरोली,दि.05ः-गडचिरोली- चिमुर हा लोकसभा क्षेत्र अतिमागास, जंगलव्याप्त, आदिवासी बहुल, नक्षल प्रभावित, दुर्गम व अविकसित क्षेत्र आहे. या क्षेत्रातील एकमेव वडसा- गडचिरोली या नवीन रेल्वे मागार्ला मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे. मात्र जमीन अधिग्रहण व मार्गाच्या बांधकामासाठी निधीची पूर्तता करण्यात न आल्याने या रेल्वे मार्गाचे काम रखडलेले असुन अजूनही सुरू झालेले नाही. जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करून व निधीची पूर्तता करून सदर मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी ४ मार्च रोजी नियम ३७७ अधीन सुचनेअंतर्गत लोकसभेत केली.
गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राच्या विकासासाठी गडचिरोली-आष्टी- आलापल्ली- सिरोंचा- मंचेरीयाल- आदीलाबाद तथा नागभीड – काम्पा टेम्पा- चिमुर- वरोरा या दोन नवीन रेल्वे लाईनच्या सर्व्हेक्षणासाठी निधीची तरतूद करण्याची मागणीही खा.नेते यांनी लोकसभेत केली.
लोकसभेत निवेदन करतांना खा. नेते यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील वडसा- गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करून निधीची पूर्तता करावी, असे सांगितले. तसेच वरील दोन्ही नवीन रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणसाठी निधीची तरतूद करावी, तसेच नागभीड- नागपूर या ब्रांडगेज मार्गासाठी त्वरित जमीन हस्तांतरित करून निधीची पूर्तता करण्याची मागणी खा. अशोक नेते यांनी लोकसभेत करून याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले.