वाशिम, दि. ०६ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण तसेच कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज स्वीकारणे व अर्जातील त्रुटी दूर करण्याचे काम सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत केले जाते. या कामांविषयी त्रयस्थ व्यक्ती, एजंट, संघटना, शासकीय कर्मचाऱ्यांकडून होणारी दिशाभूल व फसवणूक होवू नये, याकरिता बांधकाम कामगारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौ. र. नालींदे यांनी केले आहे.
कामगार नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी अर्ज देण्याकरिता फेब्रुवारीपासून सरकार कामगारी अधिकारी कार्यालयावर प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे कामगारांना व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे कामगारांचा वाढता रोष, वादविवाद तसेच कामगारांना होणारा त्रास पाहता मंडळाचे कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने चालू करण्यासाठी तसेच तालुकास्तरावर नोंदणी घेण्यसंदर्भात विशेष नोंदणी अभियान राबविण्याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. याबाबत सूचना प्राप्त होताच जिल्ह्यातील नोंदणी व नुतनीकरण तसेच कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज स्वीकारणे व अर्जातील त्रुटी इत्यादीबाबतचे कामकाजाबाबत वृत्तपत्राद्वारे कळविण्यात येईल, असे श्री. नालींदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.