वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार

0
75

राजुरा,दि.08ः सरपण गोळा करण्यासाठी गेलेला मजूर वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना विहीरगाव परिसरात घडली. उद्धव मारोती टेकाम, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मध्य चांदा वनविभाग अंतर्गत येणार्‍या विहीरगाव बिटातील सर्व्हे नंबर ३३६ मध्ये चुनाळा गावातील उद्धव टेकाम हे सरपण गोळा करायला गेले. सरपण गोळा करीत असताना अचानक वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात टेकाम यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. टेकाम यांच्या शरीराचा अर्धा भाग वाघाने फस्त केला. ही घटना आज उघडकीस आली. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. राजुरा तालुक्यातील वाघाची शिकार होण्याची ही पाचवी घटना असून दोन दिवसांपूर्वी चुनाळा येथील मनोहर निमकर यांची गाय वाघाने मारली आहे यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून वाघाला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
दरम्यान घटनेची माहीती मिळताच माजी आमदार तथा भाजप नेते सुदर्शन निमकर यांनी मृतकाचा कुटुंबीयाची भेट घेतली. कुटुंबाचे सांत्वन त्यांनी केले. मृतदेह उत्तरीय तपासणीला नेला असता मृतकाच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची तात्काळ मदत करण्यात आली. यावेळी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल गर्कल, पोलिस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर सरपंच दिनकर कोडापे, उपसरपंच बाळनाथ वडस्कर, सुनील देशपांडे यांची उपस्थित होते.
वाघाला जेरबंद करा अन्यथा आंदोलन
राजुरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तींचा आकडा दिवसागणिक फुगत आहे. नित्य होणारे व्याघ्रदर्शन, अधूनमधून होणार्‍या हल्ल्याने नागरिक भयभित झाले आहेत. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची भूमिका माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी घेतली आहे.