
गडचिरोली,दि.08: जागतिक महिला दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलाने जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांसाठी ‘ऑपरेशन रोशनी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करुन त्यांना औषधोपचार व शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहे. आज महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ५ महिला व ६ पुरुष अशा ११ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या जीवनातील अंधकार दूर होईल, असा विश्वास श्री.बलकवडे यांनी व्यक्त केला. गरजूंनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी पोलिस विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.